'कृउबा'तील शौचालय तोडून दुकान बांधण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:40+5:302021-05-11T04:16:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शौचालय तोडून त्या ठिकाणी काही जणांकडून दुकान बांधण्यात येत असल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शौचालय तोडून त्या ठिकाणी काही जणांकडून दुकान बांधण्यात येत असल्याचा प्रकार पुन्हा रविवारी घडला. याबाबत व्यापाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा हे काम थांबवले असले, तरी स्वच्छतागृहांमधील लहान भिंती तोडून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावरून पुन्हा आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात देखील याचप्रकारे काही जणांनी बाजार समितीच्या संकुलातील स्वच्छतागृहांची जागा तोडून त्या ठिकाणी दुकान बांधण्यास सुरुवात केली होती. तसेच संबंधित व्यक्तींनी स्वच्छतागृह आला कुलूपदेखील लावले होते. व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर व याप्रकरणी मनपा आयुक्तांनी बाजार समिती परिसरात स्वच्छतागृहांची गरज असताना त्या ठिकाणी दुकान बांधणे योग्य नसल्याचे सांगत बाजार समिती प्रशासनाला याबाबत पत्रदेखील पाठवले होते. त्यानंतर हे स्वच्छतागृह पुन्हा सुरू झाले होते. मात्र रविवारी पुन्हा संबंधित व्यक्तींनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वच्छतागृहांमधील भिंती तोडून दुकान तयार करण्याचे काम सुरू केले होते. याबाबत व्यापाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी जाऊन हे काम पुन्हा थांबवले आहे. तसेच याबाबत मनपा प्रशासन व बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणीदेखील व्यापाऱ्यांनी केली आहे.
संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करा
याबाबत कारवाईसाठी मनपा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्त, अतिक्रमण विभाग प्रमुख अधिकारी आणि प्रभागातील इंजिनियर, टाऊन प्लॅनिंग अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
व्यापारी घेणार मनपा आयुक्त व सभापतींची भेट
बुधवारी व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेणार आहेत. तसेच शौचालय तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करणार आहे.
कोट..
बाजार समितीत झालेल्या वादाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच याप्रकरणी काही बोलता येईल.
-कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती