भारतीय कंटेनर महामंडळाचे भुसावळातील आगार बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:00 PM2020-04-30T12:00:02+5:302020-04-30T12:01:49+5:30

कामकाज गुंडाळले : आयात-नियार्तीच्या वार्षिक १७०० कोटींच्या उलाढालीला खीळ

Ghat to close the depot of Bhusawal of Indian Container Corporation | भारतीय कंटेनर महामंडळाचे भुसावळातील आगार बंद होणार

भारतीय कंटेनर महामंडळाचे भुसावळातील आगार बंद होणार

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या केळीसह डाळ, मसाले, फळांचे रस यांच्या नियार्तीसह वेगवेगळ््या कच्च्या मालाच्या आयातीसाठी खान्देशावासीयांना सोयीचे असलेले भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार (डेपो) बंद होणार आहे. रेल्वेच्या जागेत असलेल्या या आगाराचे मासिक भाडे मोठ्या प्रमाणात वाढविल्याने महामंडळाने येथील कामकाज गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून तशी नोटीस रेल्वेसह आयात-निर्यातदारांनाही दिली आहे. मात्र यामुळे येथील आयात-नियार्तीच्या वार्षिक १७०० कोटींच्या उलाढालीला फटका बसणार असून कामगार, मजूर, शेतकरी यांनाही याचा परिणाम सहन करावा लागणार आहे.
विदेशी चलन मिळण्यास मोठा हातभार
केळीचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या जळगावातील केळीला परदेशवारी घडविण्यात मोठा वाटा असलेल्या भारतीय कंटेनर महामंडळाच्या भुसावळ येथील आगाराची स्थापना १९९१मध्ये झाली व खान्देशातील आयात-निर्यातदारांना मोठा आधार मिळाला. इतकेच नव्हे यामुळे येथील आयात-निर्यात वाढीलाही मदत झाली. याच आगारामुळे केळी परदेशात पोहचली व त्या सोबतच खान्देशातून विविध वस्तूंची निर्यात मोठया प्रमाणात वाढली. यामध्ये डाळ, मसाले, फळांचा रस, निर्जलीकरण केलेला कांदा व इतर बरेच पदार्थ ३० ते ३५ देशात निर्यात होऊ लागले. यामुळे विदेशी चलन मिळण्यास मोठा हातभार लागून येथील उद्योग-व्यवसाय भरभराटीला आले. सोबतच विदेशातून आयात होणाऱ्या वस्तू मुंबई येथे न येता थेट जिल्ह्यात येऊ लागल्याने खर्चासह वेळेचीही बचत होऊ लागली.
अचानक भाडेवाढ
भारतीय कंटेनर महामंडळाचे भुसावळ येथील आगार रेल्वेच्या जागेत असून रेल्वे आतापर्यंत कंटेनरप्रमाणे भाडे आकारत होती. मात्र आता रेल्वेने जागेनुसार भाडे आकारण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या ५२ एकर जागेत असलेले हे आगार मात्र केवळ १० एकर जागेचाच वापर करीत आहे. मात्र रेल्वेने आता प्रती माह ३ कोटी रुपये भाड्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र एवढे उत्पन्नही नसल्याने व आर्थिक तोटा वाढत असल्याने भारतीय कंटेनर महामंडळाला ते परडवणारे नसल्याने येथील कामकाज गुंडाळण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. तसे आदेशच वरिष्ठ पातळीवरून आल्याने भुसावळ येथील अधिकाऱ्यांनी तशी नोटीस रेल्वेला दिली व या विषयी आयात-निर्यातदारांनाही कळविले.
उद्योजक व्यवसायिकांची चिंता वाढली
खान्देशातील उद्योग-व्यावसायिकांकडून होणाºया व्यवहारांमुळे या आगारात दरवर्षी आयातीचे एक हजार कोटी तर नियार्तीचे ७०० कोटी रुपये अशी एकूण १७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र आगार बंद करण्याच्या निर्णयाने महामंडळ या उलाढालीवर पाणी तर सोडतच आहे, शिवाय यामुळे उद्योजक-व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. हे आगार बंद झाल्यास माल पोहचविण्यासाठी व आणण्यासाठी थेट मुंबई येथे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे आर्थिक बोझा वाढणार असून त्यामुळे किंमतीवरही परिणाम होऊ शकतो.
आयात-नियार्तीची घडी विस्कटणार
भारतीय कंटेनर महामंडळाच्या भुसावळ येथील आगारात वेगवेगळ््या कामांसाठी जवळपास १०० कामगार असून कंपन्यांमधील मजूर यांनाही याचा फटका बसणार आहे. सोबतच निर्यात थांबल्यास शेती मालही पडून राहून शेतकºयांना फटका बसू शकतो. तसेच आयात-नियार्तीच्या सुविधेमुळे चार-सहा महिन्यांपासून करार करून ठेवलेल्या मालाची आयात कोठे होणार, निर्यात कशी करावी या सर्व प्रक्रियेवर परिणाम होऊन आयात होणारा माल पोहचविण्याचे ठिकाण बदलविण्याची वेळ येऊन आर्थिक भार वाढणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
व्यवहार पूर्ण करून देणार
सध्या या आगाराकडे नोंद झालेले आयात-नियार्तीचे व्यवहार पूर्ण करून दिले जाणार असल्याचे महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
उद्योजक, व्यावसायिकांकडून पत्रव्यवहार
अचानक आयात-नियार्तीचेच केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा उद्योजक, व्यावसायिकांना मोठा धक्काच बसला. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी उद्योजक, व्यावसायिकांनी महामंडळाकडे केली आहे. या संदर्भात जैन उद्योग समूह, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन व इतरही दालमिल चालकांनी महामंडळाला पत्र पाठविले आहे.


रेल्वेने जागेचे भाडे वाढविल्याने व आर्थिक तोटा वाढत चालल्याने भुसावळातील डेपो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अनिल ठाकूर, व्यवस्थापक, भारतीय कंटेनर महामंडळ, भुसावळ.

भारतीय कंटेनर महामंडळाने आपले भुसावळातील आगार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा आयात-नियार्तीवर मोठा परिणाम होणार आहे. विविध देशात जाणारा जिल्ह्यातील माल पडून राहू शकतो.
- डी.आय. देसर्डा, वरिष्ठ उपाध्यक्ष, जीएसटी विभाग, जैन उद्योग समूह.

भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळामुळे निर्यातवाढीस चालना मिळाली असून जिल्ह्यासाठी ती मोठी सोय आहे. महामंडळाने आपला निर्णय बदलविणे आवश्यक आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव

Web Title: Ghat to close the depot of Bhusawal of Indian Container Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव