कोरोनाच्या संशयाची भुतं मानगुटीवर बसल्याने भाऊबंदकीत जावू लागले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:09 PM2020-06-17T16:09:02+5:302020-06-17T16:10:19+5:30
कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव पाहता भाऊबंदकीत तडे जात असल्याचे खेदजनक चित्र दृष्टीक्षेपात येत आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : सद्य:स्थितीत सुरू असलेल्या छोटेखानी घरगुती विवाह सोहळ्यात निकटच्या भाऊबंद एखाद्या कोरोना बाधित रूग्णाचा जिवलग मित्र वा आप्तेष्ट असल्याच्या संशयाचे भूत मानगुटीवर बसल्याने अघोषित बहिष्कार टाकण्याचे प्रकार वाढीस लागल्याने, कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव पाहता भाऊबंदकीत तडे जात असल्याचे खेदजनक चित्र दृष्टीक्षेपात येत आहे.
अनलॉकमुळे सर्वसामान्य जनता अनावश्यक कारणाने रस्त्यावर उतरत असल्याने शहरी भागातून ग्रामीण भागातही कोरोनाने आपला पाय पसारल्याने शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना बाधित रूग्णांचा आलेख त्याच सरासरीने वर सरकू लागला आहे. परिणामी खेडेगावात प्रतिबंधित क्षेत्र सीलबंद करताना प्रशासकीय लवाजमा व पोलीस असे चित्र पाहताच कोरोनासंबंधीची भीती ग्रामीण जनतेच्या मनात घर करू लागली आहे.
परिणामी प्रतिबंधित क्षेत्रात वा गावात अन्य कुणी कोरोना बाधिताच्या संपर्कात आहे का? याचा समाजमनात उहापोह होऊ लागताच जो तो आत्मपरीक्षण करून, स्वत:ची चाचपणी करत अंगावरची कातडी काढण्याचा प्रयत्न करतानाचे चित्र दिसून येते. किंबहुना, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेत आपुलकीची भावना दृढ असल्याने व मैत्रीसंबंध, नातेसंबंध, नित्याचा संपर्क या बाबी जनसामान्यांच्या डोळ्यासमोर राहत असल्याने कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती प्रशासनासमोर येत नसला तरी, समाजमनाची त्यावर वक्रदृष्टी असते.
कोरोनाचे सावट पुढील वर्षांत असेच कायम राहिल्यास पुढच्या वर्षीही छोटेखानी घरगुती विवाह करण्याचा प्रसंग उद्भवणार असल्याने ‘कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर’ असे म्हणत शुभमंगल विवाहाच्या सनई चौघडा आता घरातल्या घरात मोठ्या प्रमाणात वाजू लागले आहे. त्या अनुषंगाने कोरोना बाधित वा संशयित रुग्ण आपल्या या छोटेखानी समारंभात सहभागी होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. यातूनच भाऊबंदकीत अशा संशयित रुग्ण वा व्यक्तीचा समावेश असला तर, त्याला टाळण्यासाठी निमंत्रणाचे वरकरणी पण अवमानास्पद सोपस्कार पार पाडून त्यास पूर्णत: टाळण्याचा यथोचित प्रयत्न केले जातात. संबंधित व्यक्तीला त्या अघोषित बहिष्काराची भनक लागली म्हणजे तो आपल्या अपमानाची आग शांत होत नाही तोपर्यंत ते किल्मिष मनात संचित करून ठेवत असल्याने भाऊबंदकीत कोरोनामुळे तडा जाऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे.