भुताचा फेक व्हिडिओ बनविणाऱ्यांची भुते पहूर पोलिसांनी उतरविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:09+5:302021-09-26T04:18:09+5:30
तोरनाळाजवळील पठारतांडा (ता. जामनेर) येथील जागेवरील मध्यरात्रीची वेळ असलेला, पुरुष जातीसह अर्ध्या धडाचा व स्त्रीजातीचा दोन्ही हातांत ...
तोरनाळाजवळील पठारतांडा (ता. जामनेर) येथील जागेवरील मध्यरात्रीची वेळ असलेला, पुरुष जातीसह अर्ध्या धडाचा व स्त्रीजातीचा दोन्ही हातांत हात घालून उलटे पाय असलेला भुताटकी स्वरूपातील बनविलेला बनावट व्हिडिओ शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. अखेर पहूर पोलिसांनी देऊळगाव गुजरी येथील रहिवासी जमील शहाँ, गोपाल तवर व सतीश शिंदे यांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक एस. पी. बनसोड, फत्तेपूर दूरक्षेत्राचे अनिल सुरवाडे व किरण शिंपी यांनी चौकशी करून सोडले आहे; परंतु पोलीस या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचाही अभ्यास या प्रकरणात पोलीस करीत आहेत. व्हिडिओ बनविण्याचा उद्देश काय, याचा पोलीस शोध घेत असून व्हिडिओमध्ये असलेली स्त्री व अर्ध्या धडाचा पुरुष जागेवर आला कसा? असा प्रश्न पोलिसांसमोर आल्याने तिघांकडून चौकशीचे धागेदोरे तपासण्यात येत आहेत. वेळेप्रसंगी संबंधित तिघांविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जळगावहून येताना भुते जागविली
हे तिघे जळगावहून देऊळगाव गुजरीकडे शुक्रवारी रात्री जात होते. तोरनाळा गावाच्या अलीकडे असलेल्या जामनेर रस्त्यावर घाटी चढल्यावर पठारतांडा फाटा आहे. या ठिकाणी वाहन उभे करून मोठा लाईट न लावता छोटा लाईट लावलेला दिसतो. वाहनात स्वतः गाणे म्हणून व्हिडिओ तयार केल्याचे दिसून आले. या दरम्यान भुताटकी स्वरूपात मिक्सिंग केली आहे. ज्यामुळे नागरिक भयभीत होत आहेत. या बाबी चौकशीदरम्यान संशयास्पद आढळल्या आहेत.
व्हिडिओ बनविलाच नाही
संबंधित जागी आम्ही थांबलो; पण भुते दिसली नाहीत, अशा स्वरूपात भुताटकीचा बनावट व्हिडिओ तयार केला नसून इतर कोणी लोकांनी व्हिडिओमध्ये मिक्सिंग करून सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा जबाब संबंधित तिघांनी पोलिसांना लिहून दिला आहे.
फेक व्हिडिओसंदर्भात सत्यता पडताळून पाहत आहोत. या संदर्भात तीन संशयितांची चौकशी केली आहे. चौकशीत संशयास्पद आढळून आल्यावर संबंधित तिघांविरुद्ध पुढील कारवाईची दिशा निश्चित करण्यात येईल. नागरिकांनी भयभीत होऊ नये.
-अरुण धनवडे,
पोलीस निरीक्षक,
पहूर पोलीस ठाणे