घरांमधून प्लॅस्टिक गोळा करून ग्रामस्थांना दिली कापडी पिशवी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:29 PM2019-09-28T18:29:38+5:302019-09-28T18:32:09+5:30
‘प्लॅस्टिक मुक्त गाव’ अभियान : एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
जळगाव- एसएसबीटी महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांनी पाळधी गावात ‘प्लॅस्टिक मुक्त गाव’ अभियान राबवून घरा-घरातून प्लॅस्टिक गोळा करित ग्रामस्थांना कापडी पिशव्या भेट दिल्या़ या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत असून विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती सुध्दा करण्यात आली.
‘प्लॅस्टिक मुक्त गाव’ अभियान हा अभियान शनिवारी एसएसबीटी महाविद्यालयाच्या एमबीए विभाग व उन्न भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विशाल एस. राणा यांच्या नेतृत्वखाली राबविण्यात आला़ दरम्यान, एमबीएच्या अभ्यासक्रमातील एक शैक्षणिक भाग म्हणून तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी जोपासली जावी व सामाजिक समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्लॅस्टिक पिशव्यांचे संकलन
उपक्रमाअंतर्गत एम.बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी पाळधी गावांमध्ये घरोघरी जाऊन प्लॅस्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत नागरिकांमध्ये शनिवारी सकाळी जनजागृती केली. तसेच नागरिकांच्या घरांमधील प्लॅस्टिक पिशव्यांचे संकलन करून या उपक्रमांतर्गत त्यांना एक कापडी पिशवी भेट दिली. व यापुढे कापडी पिशव्या वापर करावा, असे आवाहन केले़ नागरिकांनी सुद्धा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत यापुढे प्लॅस्टिक पिशव्या वापरणार नसल्याची ग्वाही दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठीउपक्रमाचे समन्वयक डॉ. विशाल राणा, डॉ़ रिचा मोदीयानी, प्रा. मुकेश अहिरराव, डॉ सरोज पाटील व एमबीएच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. संजय शेखावत, डॉ. पी. ए. शिरोळे, डॉ. पी. जी. दामले व प्रा. फरोजा काझी यांचे मार्गदर्शन मिळाले.