उमेदीतली नौटंकी

By admin | Published: July 15, 2017 06:03 PM2017-07-15T18:03:37+5:302017-07-15T18:03:37+5:30

महाविद्यालयीन दिवसात केलेली नाटकं आठवलीत की तनामनात इंद्रधनूचा सप्तरंग चमकल्यासारखं वाटतं. ऐंशीच्या दशकात सिनेमाचा फस्र्ट डे फस्र्ट शो पाहणारी आमची पिढी नाटकाचीही तितकीच शौकीन होती.

Gimmicks | उमेदीतली नौटंकी

उमेदीतली नौटंकी

Next

काहींची नाटकांत झालेली फटफजिती किंवा फियास्कोसुद्धा तितक्याच खिलाडी वृत्तीने आम्ही एन्जॉय केलाय. महाविद्यालयीन जीवनात हीरो झालेली मंडळी आज व्यवहारी जीवनात झीरो अवर्सर्पयत ऑफिसात काम करणारी चाकरमानी झाली आहेत. बंडय़ा नावाप्रमाणेच बंड होता. तो डॅशिंग होता. त्याच जीवावर तो कॉलेजला गॅदरिंग सेक्रेटरी म्हणून निवडून यायचा. तो कॉलेजचा बॉसच आहे, असा वागायचा. आमचे प्राध्यापक इतके कडक शिस्तप्रिय, पण त्यालाही घाबरायचे. तो गॅदरिंगच्या नाटकातील महत्त्वाची भूमिका हिसकावून घ्यायचा. खरं तर त्याला नाटकातले ओ की ठो कळायचे नाही, तरी तो नाटकात इन्स्पेक्टरची भूमिका करायचा. पूर्वीच्या सिनेमात जसं सर्व काही आटोपल्यावर पोलीस येतात, तशीच  त्याची एन्ट्री नाटकाच्या शेवटी असायची. त्या वर्षी झालं असं की, कॉलेजच्या निवडणुकीत त्याच्या विरोधात एका मुलीने लढत दिली आणि ती निवडून पण आली. बंडय़ाची विकेट पडली. पराभव त्याच्या जिव्हारी लागला. याचा वचपा काढण्यासाठी तो संधी शोधू लागला. ती त्याला गॅदरिंगच्या वेळी मिळाली. पहिल्या दिवसाच्या नाटकात त्या मुलीची भूमिका होती. बंडय़ाने आदल्याच दिवशी बाजारातून सडके टमाटे आणून ठेवले होते. नाटक सुरू झाले. त्या मुलीची एन्ट्री झाली अन् तिच्यावर प्रेक्षकांमधून टमाटय़ांचा मारा सुरू झाला. बिचारी लालबुंद होऊन विंगेत पळाली. सर्व स्टेजवर लाल चिखल तयार झाला होता. दुस:या दिवसाच्या नाटकात मात्र इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असणा:या बंडय़ाला मात्र सडक्या अंडय़ांचा प्रसाद खावा लागला. 

एका वर्षी दोन मित्रांनी दोन पात्री एकांकिका बसवली. आज तयारी करू, उद्या तयारी करू म्हणता म्हणता सादरीकरणाची वेळ येऊन ठेपली. अशा वेळी काय करायचे. मग त्यांनी पडद्याच्या मागे प्रॉम्पटर ठेवून तो जसे संवाद वाचेल, तसे बोलायचे ठरवले. पण प्रॉम्पटरचा आवाजच ऐकू येईना. मग त्याला स्टेजवरच टेबलाखाली बसवले. अशावेळी गंमतच झाली. प्रॉम्पटरने वाचलेले संवाद यांना नीट ऐकू यायचे नाहीत. म्हणून हे त्याला, ‘मोठय़ाने बोल, मोठय़ाने बोल’ असे मोठय़ाने सांगायचे. तो मोठय़ाने संवाद वाचू लागला. ते सरळ माईकवरून प्रेक्षकांना ऐकू यायला लागले. तो वाचायचा त्याच्या मागून हे दोघे बोलायचे. शिवाय त्याला टेबलाखालून नीट दिसायचे नाही, म्हणून तो जोरात ओरडायचा, ‘अरे, मला दिसत नाही.’ यांना वाटायचे तो संवादच वाचतोय. मग तेही एकमेकांना म्हणायचे, ‘अरे, मला दिसत नाही..’ नंतर रंगमंचावर इतका गोंधळ झाला की, आधीच पडलेलं नाटक प्रेक्षकांनी गोंधळ घालून सपशेल पाडलं.
एका नाटकासाठी मुलाला धोतर आणि टोपीची गरज होती. त्याचे वडील धोतर नेसत आणि टोपी घालत असत. पण वडिलांचा इतका दरारा होता की, तो त्यांच्याकडून धोतर टोपी मागू शकत नव्हता. म्हणून त्याने कपाटात घडी करून ठेवलेली ठेवणीतले धोतर टोपी गुपचूप काढून नाटकासाठी नेली. काम झाल्यावर चुपचाप ठेवून देऊ, असा विचार त्याने केला होता. पण नेमके त्याच दिवशी बापाला कुठे लग्नाला जायचे निघाले. सारे कपाट धुंडाळले. पण धोतर टोपी सापडेना. पोराचा पराक्रम ऐकून तर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली. उमेदीच्या काळातले हे ‘नाटकी’ प्रसंग आठवले की, ‘जग ही रंगभूमी’ असल्याचा साक्षात्कार झाल्यावाचून राहत नाही.
 - संजीवकुमार सोनवणे

Web Title: Gimmicks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.