प्रशासनाच्या जाचक अटीमुळे जिनिंग संघटनांचा जिनिंग सुरू करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 04:29 PM2020-04-22T16:29:08+5:302020-04-22T16:30:10+5:30
जाचक अटींमुळे जिनिंग संघटनांनी जिनिंग उद्योग सुरू करण्यास नकार दिला आहे.
गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : केवळ पाच मजुरांवर जिनिंग सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. या जाचक अटींमुळे जिनिंग संघटनांनी जिनिंग उद्योग सुरू करण्यास नकार दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात पांढºया सोन्याचे नंदनवन असून कापसाच्या उत्पादनासह कापसावर उद्योग धंदे, जिनिंग त्याचप्रमाणे प्रेसिंग, पेंड, सरकी व सरकी तेलाचे शेकडो कारखाने आहे. यात निव्वळ कापसाच्या शंभरावर जिनिंग आहेत. लॉकडाऊनमुळे लाखो टन कापूस आजही शेतकºयाच्या घरात पडला आहे, तर या कापसावर चालणाºया शंभरावर जिनिंगची धडधड गत महिन्यापासून बंद पडली असून, यात लाखोंचा रोजगार गेला आहे, तर जिनिंगचालकांवर व्यवसाय कर्जाचे व्याज सुरूच आहे.
यासंदर्भात २१ रोजी जिल्ह्यातील जिनिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाºयांसोबत बैठक झाली. त्यात जिनिंग उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली. परंतु जिल्हाधिकाºयांनी कोरोनाचे संकट व वाढता प्रभाव पाहता काही अटींवर जिनिंग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यात जिनिंगमध्ये जास्तीत जास्त पाच मजूर असावे. यापेक्षा जास्त नसावे. त्यात त्यांना मास्क, सॅनिटायझर तसेच सुरक्षित अंतर व सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम करावे. काही अनुचित घटना घडून कोरोनासारख्या आजाराची लागण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिनिंग चालकाची असेल. नंतर २५ दिवस जिनिंग सील करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश काढले आहेत.
एकीकडे कोरोनाचा आजार पाहता प्रशासन आपल्या ठिकाणी योग्य आहे तर व्यापारी आपल्या ठिकाणी योग्य आहे. यामुळे समस्त खानदेश जिनिग असोसिएशनचे उपाध्यक्ष अरविंद बरडिया यांनी या विषयावर संघटनेशी सल्ला मसलत करत हा विषय स्थगित ठेवला असल्याचे सांगितले.
बोदवड तालुक्यात आज घडीला ११ जिनिंग आहेत. प्रत्येक जिनिग्ांला एक शिफ्टला काम करण्यास किमान ५० मजुरांची गरज आहे. त्यात कापूस वाहून नेणे, माल उतवणारे, सरकवणारे, गठाणी तयार करणारे व जीन चालवणारे अशा कमीत कमी ५० मजुरांची गरज आहे. त्यामुळे जिनिंग चालवणे शक्य नाही. हाच नियम केंद्राच्या कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) लादेखील लागू असल्याने त्यांनीही खरेदीस नकार दिल्याने जिनिंग भाडे तत्वावर देणाºयाकडून सांगण्यात आले आहे.
आजच्या स्थितीत शेकडो टन कापूस शेतकºयाच्या घरात पडला आहे. शेतकरीही मेटाकुटीस तर व्यापाºयासह मजूर वर्गही रडकुंडीला आला आहे. येत्या काही दिवसांवर पेरणीला सुरुवात होईल. मग घरातील कापसाचे काय करावे, हा प्रश्न शेतकºयाला पडला आहे. दरम्यान, कापूस खरेदी केंद्र पाच हजार शंभर ते तीनशेच्या दरात कापूस खरेदी करत होते, तर जिनिंग चालक चार हजार पाचशे ते सातशेच्या प्रति क्विंटलने खरेदी करत होते. परंतु कोरोनाच्या संकटात सर्व बंद पडल्याने सर्वच हतबल झाले आहे.
आजच्या स्थितीत किमान १५ मजूर तरी जिनिंग सुरू करण्यास द्यावे. तसेच आम्हाला सुरक्षा शासनाने द्यावी. जिल्हाधिकाºयांच्या अटींनुसार आम्ही व्यवसाय सुरू करूच शकत नाही. परिणामी लॉकडाऊनपर्यंत जिनिग बंद ठेवण्याचे ठरवले आहे.
-शिरीष जैन, जिनिंग चालक, बोदवड