सदैव शब्दांच्या अलौकिक सिंहासनावर आरूढ राहणारे व तहयात रसिकांच्या मनावर गारुड करणारे गदिमा पुन्हा होणे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 07:57 PM2019-03-01T19:57:13+5:302019-03-01T19:59:12+5:30
सेनापतीने सैनिकांना आदेश करावा व सैनिकांनी कार्यवाहीसाठी सज्ज व्हावे. तसे शब्द जणू ‘गदिमां’समोर हात जोडून उभे राहात असत व एखादं लोकप्रिय गीत किंवा काव्य रसिकांसमोर येत असे. असं सामर्थ्य लाभलेला माणूस म्हणजे ग.दि.माडगुळकर होत आणि म्हणूनच सदैव शब्दांच्या अलौकिक सिंहासनावर आरूढ राहणारे व तहयात रसिकांच्या मनावर गारुड करणारे गदिमा पुन्हा होणे नाही. अनुभव जेव्हा अनुभूतीच्या उच्च पातळीवर जाऊन पोहचतो; त्यावेळी मनात सर्जनशिलता आकारास येते, असे ‘गदिमा एक आठवण : एक साठवण’ या विषयापर व्याख्यान देताना राजन लाखे यांनी हे भावोद्गार काढले.
चाळीसगाव, जि.जळगाव : सेनापतीने सैनिकांना आदेश करावा व सैनिकांनी कार्यवाहीसाठी सज्ज व्हावे. तसे शब्द जणू ‘गदिमां’समोर हात जोडून उभे राहात असत व एखादं लोकप्रिय गीत किंवा काव्य रसिकांसमोर येत असे. असं सामर्थ्य लाभलेला माणूस म्हणजे ग.दि.माडगुळकर होत आणि म्हणूनच सदैव शब्दांच्या अलौकिक सिंहासनावर आरूढ राहणारे व तहयात रसिकांच्या मनावर गारुड करणारे गदिमा पुन्हा होणे नाही. अनुभव जेव्हा अनुभूतीच्या उच्च पातळीवर जाऊन पोहचतो; त्यावेळी मनात सर्जनशिलता आकारास येते, असे ‘गदिमा एक आठवण : एक साठवण’ या विषयापर व्याख्यान देताना पिंप्री-चिंचवड (पुणे) येथील कवी-राजन लाखे यांनी हे भावोद्गार काढले.
महाराष्टÑ साहित्य परिषदेच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे २७ रोजी दुसरे पुष्प चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालयात गुंफतांना ते बोलत होते. व्यासपीठावर म.सा.प.चे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप, कार्याध्यक्ष विजय पाटील, प्रमुख कार्यवाह गणेश आढाव, व्याख्यान प्रायोजक प्रा.शरश्चंद्र छापेकर हे विराजमान होते.
आपल्या प्रवाही व प्रभावी वाक्पटूतेतून त्यांनी गदिमांच्या अनेक कविता व गाजलेल्या गीत, भावगीत, बालगीत, लावणी, अभंग आणि गीतरामायण याचे तोंडपाठ सादरीकरण करून रसिकांना दीड तास खिळवून ठेवले. व्याख्याता परिचय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र गोसावी यांनी करून दिला. प्रारंभी गदिमांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ग्रीष्मा पिंगळे या चिमुकलीने गदिमांचं गाजलेलं घननिळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा हे गीत सादर केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रा.अशोक वाबळे यांनी तर आभार संगीता देव यांनी केले. व्याख्यानास कार्यकारिणी सदस्य, सभासद, दत्तभक्त मंडळ सदस्य, विश्वस्त मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि रसिक उपस्थित होते.