गिरीश महाजन यांनी स्वीकारले अजित पवारांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:22 AM2019-02-11T11:22:43+5:302019-02-11T11:25:03+5:30
भाजपाचा शक्ती प्रमुख मेळावा
जळगाव : अजित पवारांनी बारामतीत येवून दाखवावे, असे आव्हान दिले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण बारामती व अजित पवारच काय तर कोणाचेही आव्हान स्विकारण्यास तयार आहोत, असे प्रतिआव्हान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना रविवारी दिले आहे.
जळगावात रविवारी दुपारी भाजपाच्या जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार लोकसभा क्षेत्र शक्ती प्रमुख संमेलन टीव्ही टॉवरनजीकच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी राहूल गांधी, शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली.
जळगावात रविवारी दुपारी शहरातील दूरदर्शन टॉवर केंद्राजवळ ‘अटल नगर’ येथे आयोजित भाजपाच्या जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार लोकसभा मतदार संघातील शक्ती प्रमुख संमेलनात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, माजी मंत्री एकनाथराव खडसे, रामदास अंबटकर, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विजय चौधरी, खासदार रक्षाताई खडसे, खासदार ए.टी.पाटील, खासदार हीना गावीत, सिंधी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरूमुख जगवाणी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार चैनसुख संचेती, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे, जि. प. उपाध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सिमा सीमा भोळे, धुळे येथील महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी खासदार एम. के. अण्णा पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबनराव चौधरी, नंदुरबार भाजपा संघटक कांतीलाल टाटिया उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, एकीकडे पवार बारामतीत बोलवतात तर दुकरीकडे पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील बोलवतात. मी एकटा कोठे कोठे उभा राहणार? आपण सर्वाचेच आव्हान स्विकारले, भाजपाला कोणी आव्हान देवू नये असेही त्यांनी सुनावले. राज्यात भाजपाच्या लोकसभेच्या सर्व जागा भाजपा मिळवेल यात शंका नाही. उत्तर महाराष्ट्रतील जबाबदारी माझ्यावर आहे आणि या भागातील सर्वच जागी भाजपाला यश येईल. विरोधकांना एकही जागा मिळू देणार नाही, हा माझा शब्द आहे. आतापर्यंत जे जे बोललो ते ते करुन दाखविले आह.
शरद पवार यांच्यावरही टीका
भाजपाला असंवेदनशील म्हणणाºया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गिरीश महाजन यांनी टीका केली. गोटे यांच्या जिभेला हाड नाही ! महाजन म्हणाले की, आमदार अनिल गोटे हे धुळे मनपा निवडणुकीत विरोधात गेले त्यावेळी त्यांना आपण सांगितले होते, एकही जागा तुम्हाला मिळणार नाही मात्र चकून एक जागा त्यांना मिळाली. आता मला ते धुळ्यात उभे राहण्याचे एकेरी शब्दात आव्हान देतात. ‘धुळ्यात ते .. माझ्यासमोर येवून दाखव असे म्हणतात. त्यांच्या जिभेला हाड नाही. भाजपाचा साधा कार्यकर्ताच त्यांना पराभूत करण्यास पुरेसा आहे.
सुभाष भामरे यांची राहुल गांधी यांच्यावर टीका
‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप गांधी यांच्याकडून होत आहेत. त्यामुळे त्यांचा बुध्यांक किती असेल हे देवालाच माहीत, अशी टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केली.
आमच्या घोषणा देवू नका...
कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आगे बढोच्या घोषणा दिल्या. यावरमहाजन म्हणाले की, जयजयकाराच्या घोषणा देवू नका. कार्यक्रमास एकनाथराव खडसे येताच जोरदार घोषणाबाजी झाली. खडसे यांंनी भाषणात खासदार ए. टी. पाटील आणि रक्षा खडसे यांच्यापुढे विरोधकांकडे उमेदवार नाही, असे विधान केले. यावर गिरीश महाजन विनोदाने म्हणाले की, ए. टी. पाटील आणि रक्षा खडसे यांनी हसू नये अजून उमेदवारी निश्चित व्हायच्या आहेत... काम सुरुच ठेवा.
सत्ता आणि संपत्ती नसतानाही यश- खडसे
एकनाथराव खडसे म्हणाले की, आता पक्षाची शक्ती वाढली आहे. अनेक जण इतर पक्षातूनही आले असून पक्ष अधिक बळकट झाला आहे.
केवळ नेत्यांमुळे यश मिळत नाही- जाजू
श्याम जाजू म्हणाले की, भाजपा हा संघटनावर भर देणार पक्ष असून कोणी एक व्यक्ती हा पक्ष चालवत नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा हा पक्ष आहे. जयकुमार रावल यांनी विरोधकांवर टीका केली.