'महारेल'च्या कार्यक्रमात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील प्रचंड नाराज? भाषणातही बोलून दाखवलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:10 AM2023-12-18T00:10:55+5:302023-12-18T00:19:25+5:30

गिरीश महाजनांनी कार्यक्रमाच्या मध्येच घेतला काढता पाय; काय आहे नाराजीनाट्य

Girish Mahajan and Gulabrao Patil unhappy with Maharail management organisation Nitin Gadkari Eknath Khadse Jalgaon | 'महारेल'च्या कार्यक्रमात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील प्रचंड नाराज? भाषणातही बोलून दाखवलं...

'महारेल'च्या कार्यक्रमात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील प्रचंड नाराज? भाषणातही बोलून दाखवलं...

प्रशांत भदाणे: जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. हा सोहळा जळगावचे सत्ताधारी मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या नाराजीनाट्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फत उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शासकीय प्रोटोकॉल पाळला गेला नाही, अशी खंत दोन्ही मंत्र्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत गिरीश महाजन यांचे नाव नव्हते. एका कॅबिनेट मंत्र्याचे नाव नसल्याची चूक फार मोठी आहे. परंतु असे असूनही गिरीश महाजन कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पण घडायचा तो गोंधळ घडलाच. उड्डाणपुलाच्या कोनशिलेतही त्यांचे दिसले नाही. त्याहून मोठी गफलत अशी झाली की, सत्ताधारी मंत्र्यांचे नाव डावलून त्याऐवजी विरोधी पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे नाव त्यात घेण्यात आल्याने चांगलाच गोंधळ उडाला. घडलेला प्रकार पाहता गिरीश महाजन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. एवढी मोठी चूक 'महारेल'ने केल्यामुळे दोन्ही मंत्र्यांनी कार्यक्रमाच्या भाषणात याबाबत तीव्र शब्दांत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या 'महारेल'ने हा उड्डाणपूल बांधला आहे. पण या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात सत्ताधारी मंत्र्यांचे नाव डावलण्यात आल्याने गुलाबराव पाटील चांगलेच भडकले होते. त्यांनी आयोजकांना चांगलेच खडेबोल सुनावले. कार्यक्रमात काही मिनिटं भाषण केल्यानंतर गिरीश महाजन यांनीही तेथून काढता पाय घेतला. उड्डाणपुलाचे लोकार्पण होईपर्यंत ते थांबले नाहीत. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने गुलाबराव पाटलांनी नाईलाजाने फित कापली. हा संपूर्ण कार्यक्रम नितीन गडकरींच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या आधीच उरकण्यात आला.

यात उल्लेखनीय बाब अशी की पिंप्राळा उड्डाणपूल हा अपूर्णावस्थेत आहे. जळगाव शहरातून पिंप्राळा उपनगराच्या दिशेला जाणाऱ्या एका आर्मचं काम अजून व्हायचंय. पण तरी देखील उड्डाणपुलाचे लोकार्पण घाईघाईत का उरकण्यात आलं? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Web Title: Girish Mahajan and Gulabrao Patil unhappy with Maharail management organisation Nitin Gadkari Eknath Khadse Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.