भाजपतील वादाचा अमळनेरात विस्फोट : बी.एस.पाटील व वाघ यांना एकाच गाडीत घेवून आले गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:25 PM2019-04-11T12:25:31+5:302019-04-11T12:48:14+5:30
चहापानचा कार्यक्रम संपल्यानंतर वाघ दाम्पत्यांचे आगमन
जळगाव : अमळनेर येथे झालेल्या युतीच्या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यातील कटूता दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही नेत्यांना एकाच वाहनात बसवून मेळाव्याच्या ठिकाणी आणले.
मात्र, मेळाव्यात जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी बी.एस.पाटील यांना मारहाण केल्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद आता पुन्हा विकोपाला गेले आहेत.
चहापानचा कार्यक्रम संपल्यानंतर वाघ दाम्पत्यांचे आगमन
चहापान कार्यक्रमासाठी अमळनेरमधील भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र, जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले. सायंकाळी ५.३० वाजता चहापान संपल्यानंतर वाघ दाम्पत्य इथे पोहचले.
त्यानंतर उन्मेष पाटील यांनी उदय व स्मिता वाघ यांचे स्वागत केले. स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर उदय वाघ हे देखील त्याठिकाणी आले. त्यानंतर गिरीश महाजन हे उदय वाघ व डॉ. बी.एस.पाटील यांना आपल्या वाहनात घेऊन मेळाव्याचा ठिकाणी पोहचले.
अमळनेर येथील प्रताप मिल मैदानावर भाजपा-शिवसेना युतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याआधी सायंकाळी ५ वाजता प्रताप मीलच्या कार्यालयात युतीच्या सर्व नेत्यांचा चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार बी.एस.पाटील, जि.प.शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याची वेळ दुपारी ३ वाजेची होती. मात्र, चाळीसगाव येथे मेळाव्याला उशीर झाल्यामुळे अमळनेर येथील मेळाव्याला तब्बल ३ तास उशिराने म्हणजेच सायंकाळी ६ वाजता मेळाव्याला सुरुवात झाली. मेळाव्याचा सुरुवातीला सर्व नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. मेळावा सुरु होताच अचानक वादाला सुरुवात झाली.