भाजप नेत्यांचे छायाचित्र वापरून प्रचार करणाऱ्या बंडखोरांवर कारवाई करणार - गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:12 PM2019-10-09T17:12:19+5:302019-10-09T17:12:53+5:30
बंडखोरांना तंबी
जळगाव : जिल्ह्यात भाजपाच्या काही बंडखोर उमेदवारांकडून भाजपा नेते व पालकमंत्री गिरीश महाजन यांचा फोटो वापरून प्रचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता ‘त्या’ सर्व बंडखोर उमेदवारांना प्रचारात माझा फोटो न वापरण्याचा सूचना दिल्या असून, त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जिल्ह्यात जळगाव ग्रामीणमध्ये चंद्रशेखर अत्तरदे व चोपडा मतदारसंघात जि.प.समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तसेच दोन्ही ही उमेदवारांकडून भाजपाचे पट्टे व गिरीश महाजन यांचा फोटो लावून प्रचार केला जात आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आक्षेप घेत, भाजपा यांच्यावर कारवाई करेल का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर याबाबत भाजपा नेतृत्व गंभीर असून, प्रदेशाध्यक्षांकडून लवकरच बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. भाजपा-शिवसेनेची युती असून, दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी युतीधर्म पाडायलाच पाहिजे दोन्ही पक्ष याबाबत गंभीर असून, संबधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येणार असून, पक्षाच्या नेत्यांचा फोटो न वापरण्याबाबत देखील तंबी देण्यात आल्याचेही महाजन यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटलांवर कारवाई होईलच - संजय सावंत
मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.मात्र, शिवसेना तर युतीधर्म न पाडणाºयांवर कारवाई करणारच, भाजपाने देखील आपल्या बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असेही सावंत यांनी सांगितली.