मुक्ताईनगरातून बंडखोराने निवडून येऊन दाखवावे - गिरीश महाजन यांचे आव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:28 PM2019-10-11T12:28:03+5:302019-10-11T12:28:35+5:30

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय सरकारतर्फे ...

Girish Mahajan calls for rebel to be elected from Muktinagar | मुक्ताईनगरातून बंडखोराने निवडून येऊन दाखवावे - गिरीश महाजन यांचे आव्हाण

मुक्ताईनगरातून बंडखोराने निवडून येऊन दाखवावे - गिरीश महाजन यांचे आव्हाण

Next

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय सरकारतर्फे घेतले जातील, असे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात करीत शेतकरी कर्जमाफीबाबत भाजप व शिवसेना यांची भूमिका वेगळी असल्याचे बोलून दाखविले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. मुक्ताईनगरातून शिवसेना बंडखोर उमेदवाराने निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांची गुुरुवारी दुपारी जळगाव येथे पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष तथा जळगाव शहर मतदार संघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार चंदूलाल पटेल, भाजपचे संघटन सचिव विशाल त्रिपाठी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते ज्योतिषाकडे जाऊन आकडे सांगतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर महाजन म्हणाले की, मी कधी ज्योतिषावर विश्वास ठेवला नाही. आम्ही जनतेच्या मनातील ओळखतो, म्हणूनच आम्ही किती जागा येणार हे सांगू शकतो, असे स्पष्ट केले.
बंडखोरांवर कारवाई अटळ
भाजप-शिवसेना युती झाली असली तरी जिल्ह्यात पाच ठिकाणी दोन्ही पक्षातून बंडखोरी झाली असून काही ठिकाणी थेट भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून व भाजपच्या नेत्यांचे छायाचित्र वापरून प्रचार केला जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, अधिकृत बंडखोर कोठेच नसतात. बंडखोरांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले.
मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार म्हणजे ठरवून केलेली राजकीय खेळी असल्यास तेथे बंडखोर उमेदवाराने निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
कर्जमाफीबाबत वेगळी भूमिका
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली. राज्यात युतीचेच सरकार असल्याने आता पुन्हा सरकार आल्यावर संपूर्ण कर्जमाफी देणार आहात तर ती आताच का दिली नाही?, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीबाबत त्या वेळी शिवसेना व भाजपची वेगळी भूमिका होती. आताही ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगून टाकले.
आघाडी सरकारच्या काळातील पालकमंत्र्यांनी काय केले ?
युती सरकारच्या काळात पाच वर्षात जळगाव जिल्ह्याला चार पालकमंत्री दिले असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना महाजन म्हणाले की, आम्ही जिल्ह्यात मोठे काम केले आहे. आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना गुलाबराव देवकर यांनी काय केले, ते सांगावे, असा प्रश्न उपस्थित केला.

Web Title: Girish Mahajan calls for rebel to be elected from Muktinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव