चाळीसगावातील नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी बंदूकधारी गिरीष महाजन मोहिमेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:37 PM2017-11-27T19:37:19+5:302017-11-27T20:24:02+5:30
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव वनक्षेत्रात नरभक्षक बिबट्याने घेतले पाच जणांचे बळी
जळगाव : चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी बंदूक घेत वनविभागाच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला. वनक्षेत्रातील झाडा-झुडपांमध्ये मंत्र्यांनी नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला.
चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने पशू, पक्षी यांच्यासह महिला, मुले यांचे बळी घेतले आहे. आतापर्यंत जवळपास पाच जणांचा बळी या बिबट्याने घेतला आहे. तर १२ ते १३ जण जखमी झाले आहेत. या नरभक्षक ठरलेल्या बिबट्याच्या संचारामुळे देशमुखवाडी, वरखेड, उंबरखेड, पिंप्राळा, पिलखोड, नांद्रे, काकडणे, सायगाव, आमोदे, तामसवाडी, पिंपळवाड म्हाळसा परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोमवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,आमदार उमेश पाटील, पोपट तात्या भोळे, संतोष बारी यांच्यासह वन विभाग कर्मचारी, ग्रामस्थ व पोलिसांनी जोरदार शोध मोहिम राबविली. स्वत:कडे बंदूक घेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बिबट्याचा संचार असलेल्या भागात राबविलेल्या मोहिमेत सहभाग नोंदविला.
शोध मोहिमेच्या दरम्यान भयभीत महिलांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली. महिलांनी बिबट्याला मारा असा आग्रह धरला. त्यावर महाजन यांनी बिबट्याचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत आपण जिल्ह्याबाहेर जाणार नाही असे आश्वासन दिले.