उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४० जागांवर भाजपचा विजय निश्चित - गिरीश महाजन यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:51 PM2019-08-14T22:51:34+5:302019-08-14T22:52:08+5:30
जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ जागा जिंकणार
जळगाव : लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील याचा आपण वर्तविलेला अंदाज खरा ठरला. आता विधानसभा निवडणुकीमध्येही उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४० जागा हमखास भाजपला मिळतील असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी जळगावात केला. या सोबतच जळगाव जिल्ह्यातील सर्व अकराच्या अकरा जागांवर भाजपच विजय मिळवेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र एकीकडे युती होईल असे सांगितले जात असताना भाजपच्या संघटन बैठकीत मात्र सर्व जागांवर दावा केल्याने शिवसेनेच्या वाट्याला काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने बुधवारी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांची संघटनात्मक बैठक जळगावात झाली. त्या वेळी त्यांनी हा दावा केला. या बैठकीला गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे, प्रदेश भाजप संघटन मंत्री विजयराव पुराणिक आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात येऊन शक्तीकेंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशाचा उहापोह करण्यात येऊन लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात, त्यामुळे गाफील न राहता सावधगिरीने कामे करा असा सल्ला या वेळी देण्यात आला. हा सल्ला दिला जात असताना गिरीश महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला हमखास यश मिळण्याचा दावा केला. यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगितलेल्या अंदाजाची आठवण करून देत विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात काय चित्र राहणार आहे, हे स्पष्ट केले. यात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील ४७ पैकी ४० जागांवर भाजप विजय मिळवेल. यात १५ दिवसांनंतर आणखी ‘परफेक्ट’ आकडा मी सांगतो, असेही त्यांनी नमूद केले. यात जळगाव जिल्ह्यातील तर सर्व ११ जागा भाजपलाच मिळतील, असेही त्यांनी सांगितले.