गिरीश महाजनांचा पुन्हा हटके अंदाज, घोरपडीला दिलं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:05 AM2019-10-12T09:05:27+5:302019-10-12T09:06:06+5:30
केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांची गुुरुवारी दुपारी जळगाव येथे पत्रकार परिषद झाली
जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन आपल्या हटके शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. मग, कधी कार्यकर्त्यांची भांडणं सोडवणं असो, कमरेला बंदुक लावून फिरणं असो, पुराच्या पाण्यात सेल्फी काढणं असो किंवा पाण्यात उडी मारून पूरग्रस्तांना वाचवणं असो. आता, पुन्हा एकदा गिरीश महाजनांनी असंच हटके काम केलं. जळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी सुरू असताना घोरपड निघाल्याने एकच गोंधळ उडला. त्यावेळी महाजन यांचे प्राणी-पक्षांवरील प्रेम दिसून आलं. गिरीश महाजन यांनी स्वत:च्या हातात घेऊन घोरपडीला जिवदान दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची रविवार 13 ऑक्टोबर रोजी जळगाव विमानतळासमोर जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील जळगावात पहिली सभा होत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन हे पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेच्या ठिकाण व्यवस्थेची पाहाणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी, तेथे उपस्थित कार्यर्त्यांना जिंवत घोरपड आढळून आली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून घोरपडीला मारण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, तिला मारू नका… असे म्हणत गिरीश महाजन धावतच घोरपडीजवळ पोहोचले.
लिंबाच्या झाडावर चढलेल्या घोरपडीला महाजनांनी खाली उतरवुन तिच्या तोंडावर पाय ठेवून तिचे तोंड अलगद पकडले. त्यानंतर, सिमेंटच्या पोत्यात बंद करुन आपल्या गाडीत ती घोरपड ठेवली. गिरीश महाजनांच्या या कृत्याचे कार्यकर्त्यांनी कौतुक करत टाळ्या वाजवून दाद दिली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय सरकारतर्फे घेतले जातील, असे महाजन म्हणाले. शेतकरी कर्जमाफीबाबत भाजप व शिवसेना यांची भूमिका वेगळी असल्याचेही त्यांनी जळगावात बोलून दाखविले.