गिरीश महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:01+5:302021-05-03T04:11:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १००, २०० कोटी आणू अशा वल्गना माजी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शहराची वाट लावली असून, आता शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करून शहराचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्याकडून केवळ आरोप व टीका केली जात आहे. पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. ते निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
निधी वाटपात भाजपसारखा भेदभाव केला नाही
जळगाव शहर महानगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीबाबतची माहिती देण्यासाठी अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्हा नियोजन समितीमधून एका वर्षातच ९७ टक्के निधी हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीला मान्यता देणारा मी पहिलाच पालकमंत्री असून, आम्ही विकासाचे राजकारण करतो केवळ वल्गना करत नाही. तसेच जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव अशा तालुक्यातमध्येदेखील आम्ही निधीचे वाटप केले आहे. त्या नगरपालिकेत भाजपाची सत्ता असली तरीही निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन हे निधी वाटपाचा वेळेस देखील केवळ भाजपचाच लोकप्रतिनिधींचा विचार करत होते, असाही आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.
तापी पाटबंधारे महामंडळात काय बोंब पाडली?
जलसंपदा मंत्री असताना पाच तालुके अवलंबून असलेल्या निम्न तापी प्रकल्पासाठी एक दमडी गिरीश महाजन यांनी दिली नाही, बलून बंधाऱ्याची घोषणा केवळ एखादा फुग्याप्रमाणे आहे. गिरीश महाजन यांनी केवळ संकट मोचक असा कार्यक्रम वाजवून घेतला, केवळ भुलभुलय्या करत बाहेर फिरत राहिले. जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही. निष्क्रिय पालकमंत्री ते होते, आमचा आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीमध्ये झाकून पहा असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. शहरासाठी केवळ घोषणा केला मात्र त्यात शहराकडे अडीच वर्षे ढुंकूनदेखील पाहिले नाही.
भाजपकडे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच बंगालमध्ये पराभव
भाजपकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नव्हता. म्हणूनच पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला आहे असे मत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.