गिरीश तारे यांना व.वा.वाचनालयाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 09:22 PM2021-02-07T21:22:38+5:302021-02-07T21:22:59+5:30
जळगाव : वाचनालयाच्या माजी उपाध्यक्षा रोहिणी जोशी यांचे पिताश्री कै. दे.वि. कुळकर्णी व कै.डॉ. उल्हास कडूसकर यांच्या मातोश्री कै. ...
जळगाव : वाचनालयाच्या माजी उपाध्यक्षा रोहिणी जोशी यांचे पिताश्री कै. दे.वि. कुळकर्णी व कै.डॉ. उल्हास कडूसकर यांच्या मातोश्री कै. शैलजा कडूसकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा व.वा. जिल्हा वाचनालयाचा उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार रविवारी वाचनालयाचे सेवक गिरीश तारे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
व.वा. जिल्हा वाचनालयाची १४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी होते़ व्यासपीठावर उपाध्यक्ष अॅड.सुशील अत्रे, कार्याध्यक्ष अॅड. प्रताप निकम, चिटणीस मिलिंद कुलकर्णी, सहचिटणीस अॅड. गुरुदत्त व्यवहारे व कोषाध्यक्ष अनिलकुमार शाह आदींची उपस्थिती होती. दीपप्रज्वालनाने सभेची सुरुवात झाली. त्यानंतर वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.प्रभात चौधरी यांनी श्रध्दांजली प्रस्ताव मांडल्यानंतर प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी प्रास्ताविक केले.
ग्रंथभेट देऊन सत्कार
२००१ रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. चारुदत्त गोखले व प्रा. वसंत सोनवणे यांनीही रोख रक्कम देऊन तारे यांना गौरविले. तसेच नियमित व उत्कृष्ट वाचक म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात कविता जोशी, प्रकाश बाविस्कर, दीपक तांबोळी यांचा अॅड. गुरुदत्त व्यवहारे, मिलिंद कुलकर्णी, अनिलकुमार शाह यांच्याहस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे चिटणीस मिलिंद कुलकर्णी यांना मूकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दलही त्यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार झाला.
विविध विषयांवर चर्चा
सत्कार समारंभानंतर वाचनालयाचे चिटणीस मिलिंद कुलकर्णी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. शाह यांनी वार्षिक अहवाल ताळेबंद जमाखर्च व सन २०१९-२०२० चा अर्थसंकल्प, नियमप्रमाणे कार्यकारी मंडळाचे व वर्गणीदारांचे ठराव असल्यास त्याचा विचार करणे आदी विषय मांडण्यात आले. नंतर अभिजित देशपांडे यांनी आयत्या वेळेचे विषय मांडून चर्चा करण्यात आली.
वाचनालयास ५१ हजारांची देणगी
के़ वाय़.जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व.वा.वाचनालयास डॉ.प्रदीप जोशी यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली. ती वाचनालयाच्यावतीने अॅड. सुशील अत्रे व अॅड. प्रताप निकम यांनी स्वीकारली. सभेचे सूत्रसंचालन संगीता अट्रावलकर यांनी केले. तर आभार अभिजित देशपांडे यांनी मानले. सभेला शिल्पा बेंडाळे, विजय पाठक, अॅड. दत्तात्रय भोकरीकर, शुभदा कुळकर्णी, शांताराम सोनार आदींची उपस्थिती होती.क