गिरीशभाऊ, जरा पहूरकडेही लक्ष द्या ना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:30+5:302021-08-27T04:21:30+5:30
जामनेर तालुका आरोग्य सेवेबाबत जामनेरचे नाव जळगाव जिल्ह्यात प्रकर्षाने घेतले जात असतानाच पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय ...
जामनेर तालुका
आरोग्य सेवेबाबत जामनेरचे नाव जळगाव जिल्ह्यात प्रकर्षाने घेतले जात असतानाच पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तिन्ही जागा रिक्त आहेत. नागपूर व औरंगाबाद राज्यमार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व परिसरातील सुमारे ५० खेड्यातील नागरिकांचा दररोज संबंध येत असल्याने ग्रामीण रुग्णालयात चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळणे अपेक्षित आहे. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात आरोग्य सेवेची अशी दुरवस्था होत असल्याने, ‘भाऊ, जरा पहूरकडेही लक्ष द्या ना,’ असे या भागातील नागरिक म्हणत आहेत.
आमदार महाजन यांच्या प्रयत्नाने पहूर ग्रामीण रुग्णालयास व जामनेर उपजिल्हा रुग्णालयास अतिरिक्त ५० खाटांना मंजुरी मिळाली होती; मात्र सत्ताधारी बदलल्याने व निधी उपलब्ध होत नसल्याने काम रखडले आहे. मध्यंतरी पालकमंत्री गुलाबराव पाटील तालुक्यात आले असता त्याचे याकडे लक्ष वेधले असता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत विचारणा केली होती.
पहूर वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता व सहायक अभियंता ही दोन्ही पदे रिक्त आहेत. दोन्ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत. पहूर कसबे व पहूर पेठसाठी वाघूर धरणातून पाणी पुरवठा करणारी सुमारे ३५ कोटीची योजना प्रस्तावित आहे. योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात पडून असल्याचे सांगितले जाते. आमदारांनी याकडेही लक्ष देऊन भविष्यातील पाण्याची समस्या सोडवावी. पहूरमध्ये राजकारण करणाऱ्याची कमी नाही, सत्ताधारी व विरोधक कार्यकर्तेदेखील भरपूर आहेत, तरीही समस्या सुटत नसल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे.