गिरीशभाऊ... रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्या - आयत्या पीठावर रेघोट्या मारल्याची खडसे समर्थकांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:31 PM2019-08-09T12:31:36+5:302019-08-09T12:32:03+5:30

पोलीस प्रशिक्षण केंद्राला २० वर्षांपूर्वीच मिळाली होती मंजुरी

Girishbhau ... Take credit for the work that has been put in place - Critic of Khadse supporters for rubbing his back on his back | गिरीशभाऊ... रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्या - आयत्या पीठावर रेघोट्या मारल्याची खडसे समर्थकांची टीका

गिरीशभाऊ... रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्या - आयत्या पीठावर रेघोट्या मारल्याची खडसे समर्थकांची टीका

Next

जळगाव : हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शासनाच्या माहिती कार्यालयामार्फत देखील महाजनांचे श्रेय असल्याच्या उल्लेखाचे वृत्त माध्यमांना देण्यात आले. त्यावरुन खडसे समर्थकांनी मात्र हा श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याची टीका महाजनांवर केली आहे. यावर भाजपातील सुंदोपसुंदीला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.
२० वर्षांपूर्वीच या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली होती. खडसे यांच्या पाठपुराव्याने, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मंजुरी देऊन ७ डिसेंबर १९९८ रोजी वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजनही केले होते.
त्यावेळी वरणगाव हे आ. खडसे यांच्या मतदार संघात होते, खडसे यांनी या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करुन दिली होती.
त्यानंतर आघाडीचे सरकार आल्याने निधी मिळू शकला नव्हता. २०१४ मध्ये पुन्हा युतीचे सरकार राज्यात आल्याने खडसे यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी निधी व पदेही मंजूर केली होती. केंद्राच्या प्राचार्यपदी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे नावही निश्चित झाले होते. मध्यंतरी खडसे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
या पोलीस प्रशिक्षण केंद्रालामिळालेली मंजुरी रद्द केली. तरीही खडसे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट स्थापण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन खडसे यांना दिलेले होते.
त्यानुसार ही मंजुरी मिळाली असताना गिरीश महाजन यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत हा प्रकार म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ असा प्रकार असल्याची टीका खडसे समर्थकांनी केली आहे. याबाबत सोशल मिडियावर मेसेज फिरत असल्याचे दिसून आले.
माहिती कार्यालयाच्या बातमीत महाजनांना श्रेय
जिल्हा माहिती कार्यालयाने केवळ मंज़ुरी मिळाल्याचे वृत्त माध्यमांना देणे अपेक्षित असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने ही पथक स्थापनेची मंजुरी मिळाली असल्याचा उल्लेख असलेले वृत्त प्रसिद्धीस दिले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणाने माहिती कार्यालयालाही वेठीस धरले गेल्याचे दिसून येत आहे.
भाजपात सुंदोपसुंदी
जिल्ह्यात भाजपात खडसे व महाजन या दोन गटांमध्ये राजकीय डावपेचही खेळले जात असले तरीही जाहीर कार्यक्रमांमधून सर्व आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र प्रथमच खडसेंच्या मतदार संघातील कामाचे श्रेय महाजनांनी घेतल्याने व खडसे समर्थकांनी त्यावरून महाजनांना सोशल मिडियावर ट्रोल केल्याने भाजपातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्लीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
...मग रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्या
जिल्ह्यातील महामार्गांची कामे रखडली आहेत. औरंगाबाद रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पुण्याला जाणाऱ्या बसेसला तर धुळेमार्गे जाण्याची वेळ आली आहे. या त्रासाचे श्रेयही महाजनांनी घ्यावे. शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. महामार्गावर मात्र अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात आहेत. तरसोद-फागणे या टप्प्याचे चौपदरीकरण रखडले आहे. जळगाव एमआयडीसीत एकही नवीन उद्योग पाच वर्षात आलेला नाही. आहे ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जळगाव शहराचा विकास रखडला आहे. याचेही श्रेय महाजनांनी घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Web Title: Girishbhau ... Take credit for the work that has been put in place - Critic of Khadse supporters for rubbing his back on his back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव