भुकेने व्याकूळ होऊन झाला बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:46+5:302021-04-29T04:12:46+5:30
दफन केलेला मृतदेह उकरला : व्हिसेरा राखीव जळगाव : पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीतील कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ...
दफन केलेला मृतदेह उकरला : व्हिसेरा राखीव
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीतील कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ११) या मुलीचा मृत्यू भुकेने व्याकूळ होऊन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह उकरण्यात आला.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. दुपारी दोन वाजता पुन्हा या मृतदेहाचे दफन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार भुकेने व्याकूळ होऊन बालिकेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, बालिकेच्या आई व वडिलांना पोलिसांनी मंगळवारीच ताब्यात घेतले असून, आईला महिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनीज हिचा २३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. वडील जाविद शेख याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ एप्रिल रोजी तिचा दफनविधी केला. ही घटना त्याने कोणालाच सांगितली नाही. नंतर घराला कुलूप लावून पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन तो गायब झाला. त्यामुळे संशय बळावला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कनीजच्या मामांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते कुठेही मिळून आले नाहीत. शेवटी कनीजचे मामा अजहर अली शौकत अली (रा. अमळनेर) यांनी सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या आधारावर पोलिसांनी जावेद शेख तसेच मुलीची आई या दोघांना अमळनेर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
वजन फक्त नऊ किलोडॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनातून दोन दिवस पोटात अन्न नसल्याने भूकबळीने मुलीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण निष्पन्न झाले, तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे वजनही करण्यात आले. यात अकरा वर्षांच्या मुलीचे वजन केवळ नऊ किलो एवढेच भरले असल्याचेही समोर आले. मृतदेहाचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आलेला असून, तो नाशिकला न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यातून मुलीच्या मृत्यूचे नेमके खरे कारण काय ते समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.