पाय घसरुन नदीत पडल्याने युवतीचा मृत्यू; जामनेर : पुरात वाहून गेलेल्या अन्य दोघांचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:48 PM2024-09-03T16:48:48+5:302024-09-03T16:49:16+5:30
हिवरखेडे बुद्रुक शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पालक, खादगाव ग्रामस्थांनी पुलावर एकच गर्दी केली.
- मोहन सारस्वत
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर (जि. जळगाव) : जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस मुक्कामी आहे. पुलावरुन पाय घसरुन कांग नदीत पडल्याने १७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी जामनेर येथे घडली. दरम्यान, तालुक्यात सोमवारी आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले आहेत. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही.
पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (१७. रा. खादगाव ता. जामनेर) असे या मृत युवतीचे नाव आहे. ती सकाळी शिकवणीसाठी खादगावहून जामनेरला आली. बसस्टॉप उतरुन ती पायीच शिकवणी वर्गाकडे जात होती. त्याचवेळी कांग नदीवरील पुलावरुन पाय घसरुन ती पाण्यात बुडाली.
हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तिचा शोध घेतला. हिवरखेडे बुद्रुक शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पालक, खादगाव ग्रामस्थांनी पुलावर एकच गर्दी केली.
दरम्यान, जामनेर तालुक्यात सोमवारी आलेल्या पुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोहन पंडित सूर्यवंशी (४६, रा. शहापूर ता. जामनेर) आणि केदार पावरा (२४, रा. बोदवड) हे दोन्ही जण वाहून गेले आहेत. त्यांचा दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही.