कुत्र्याच्या हल्ल्यात पाळधी येथील मुलगी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:20+5:302021-05-28T04:13:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पाळधी, ता.धरणगाव येथील एका सहा वर्षीय मुलीला कुत्रे चावल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पाळधी, ता.धरणगाव येथील एका सहा वर्षीय मुलीला कुत्रे चावल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी झाली आहे. या मुलीवर प्राथमिक उपचार व अॅन्टी रेबीज सिरम हे इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देऊन डॉक्टरांच्या निरीक्षणासाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले.
पाळधी येथील पुनम विजय भोई (वय : ६) या मुलीला सकाळी हे कुत्रे चावले. अगदी मानेपासून ते पायापर्यंत या कुत्र्याने या बालिकेला चावा घेतला आहे. गंभीरावस्थेत तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्रथमोपचार करून दोन तास डॉक्टरांनी दाखल करून घेतले, ॲन्टी रेबीज सिरम इंजेक्शन दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील कळसकर यांनी दिली.
त्या मुलाला डिस्चार्ज
कळमसरे येथील यश सोनवणे या लहान मुलाच्या कानाचा कुत्र्यांनी लचका तोडला होता. या मुलावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३ दिवस उपचार केल्यानंतर त्याला गुरूवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या मुलाची भेट घेऊन त्याला बिस्कीट व चिक्की देऊन निरोप दिला.