एरंडोलला पेप्सी खाल्ल्याने बालिका दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:25 PM2019-03-15T23:25:14+5:302019-03-15T23:25:32+5:30
दोघं सख्या बहिणींना विषबाधा
एरंडोल - शहरातील कागदीपुरा येथील रहिवासी खदिजा कश्यफ शेख इरफान (वय ४ वर्षे), सहेर अंजुम शेख इरफान (वय २ वर्षे) या दोघी बहिणींनी पेप्सी खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यात खदिजा हिचा मृत्यू झाला तर सहेरची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात पालकांमध्ये घबराट पसरली आहे.
एरंडोल येथील महमूद खान तजम उल्ला खान यांचे राहत्या घराच्या ओट्यावर छोटे दुकान असून पेप्सी विक्री करतात. अमळनेर येथील एका विक्रेत्याने मेहमूद खान याला पेप्सीचा माल घरपोच दिल्याचे समजले. त्यातून महंमद खान यांच्या नाती (मुलीच्या मुली) खदिजा कश्यप शेख इरफान, सहेर अंजुम शेख इरफान या दोन्ही चिमुकल्या मुलींनी शुक्रवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पेप्सी आणून खाल्ली. काही मिनिटातच त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्या व तोंडाला फेस आला. त्या वेळी नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच खदिजा कश्यफ शेख इरफान हिचा मृत्यू झाला.