कमी मार्कांची भीती; वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडलं अन् घरी येऊन जीवन संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 03:27 PM2022-07-23T15:27:05+5:302022-07-23T15:48:39+5:30

निकाल लागण्याच्या एक तास आधीच तृप्तीने जीवन संपविले. तृप्ती केंद्रीय विद्यालयात सीबीएसईची विद्यार्थिनी होती.

Girl suicide in jalgaon fear of low marks in CBSE 10th Exam | कमी मार्कांची भीती; वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडलं अन् घरी येऊन जीवन संपवलं!

कमी मार्कांची भीती; वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडलं अन् घरी येऊन जीवन संपवलं!

googlenewsNext

जळगाव - दहावीत पास होणारच, पण अपेक्षित गुण कमी पडणार या भीतीने तृप्ती रवींद्र साळुंखे (वय १७) या सीबीएसई दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता पिंप्राळ्यातील आनंदमित्र सोसायटीत घडली. निकाल लागण्याच्या एक तास आधीच तृप्तीने जीवन संपविले. तृप्ती केंद्रीय विद्यालयात सीबीएसईची विद्यार्थिनी होती. दुपारी निकाल जाहीर झाला. त्यात तिला ७८ टक्के गुण मिळाले आहेत.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळ्यातील आनंदमित्र सोसायटीत एकमुखी दत्त मंदिराजवळ तृप्ती आई-वडिलांसह वास्तव्याला होती. भाऊ आशिष पुण्यात इंजिनिअर आहे. वडील सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ते डिफेन्स सिक्युरिटी फोर्स (डीएससी) मध्ये रुजू झाले होते. ते गुवाहाटीला हवालदार पदावर कार्यरत होते. रजा संपल्यानंतर शुक्रवारी ते गीतांजली एक्सप्रेसने गुवाहाटीला जाणार होते. वडिलांना सोडण्यासाठी तृप्ती रेल्वे स्टेशनवर गेली व तेथून घरी आली. आई सविता ही बाहेर भांडी धूत होती. ते काम आटोपल्यानंतर घरात गेली असता, तृप्ती ज्या खोलीत होती त्याचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने आईने शेजारच्यांना बोलावले. त्यांनी दरवाजा तोडला असता, तृप्तीने गळफास घेतल्याचे दिसले.

साखळी ओढून थांबवली रेल्वे

तृप्तीने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे लक्षात येताच सविता यांनी पतीला फोन करून तत्काळ घरी येण्याचे सांगितले. तेव्हा गीतांजली एक्सप्रेसने स्थानकातून नुकतीच सुरू झाली होती. पत्नी घाबरली आहे, परंतु कारण सांगत नाही. काही तरी विपरित घटना घडल्याचा संशय आल्याने त्यांनी चालत्या गाडीची साखळी ओढून गाडी थांबवली व तेथून थेट घर गाठले. तृप्तीला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास नीलेश पाटील करीत आहेत.

चार ठिकाणी लावले होते क्लास

तृप्ती ही केंद्रीय विद्यालयात दहावीला होती. शुक्रवारी दहावीचा निकाल होता. भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याने तृप्ती हिने चार ठिकाणी क्लासेस लावले होते. त्यात अकरावीच्या क्लासेसचाही समावेश होता. वडिलांनी प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे चारही क्लासेसचे एक लाख रुपये ॲडव्हान्स भरले होते. इतकी मोठी रक्कम भरली आहे. दहावीला मेहनतही खूप घेतली, तरी देखील टक्के कमी पडतील. तसे झाले तर पैसे वाया जातील, स्वप्नांचा चुराडा होईल, या तणावात आल्याने तृप्तीने निकालाच्या एक तास आधीच जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक चौकशीत हेच कारण समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.

सैन्यात अधिकारी अन् डॉक्टरचे स्वप्न

तृप्ती हिने आठवीत विविध क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. वडील सैन्य दलात असल्याने आपणही याच क्षेत्रात मोठ्या पदावर अधिकारी होऊ, असे स्वप्न तिने रंगवले होते. त्यानंतर दहावीत आल्यावर वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेऊन तशी तयारी केली होती, अशी माहिती वडील रवींद्र नथ्थू साळुंखे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

६ जुलैला वाढदिवस जल्लोषात

‘तृप्ती हिचा ६ जुलै रोजी वाढदिवस होता. त्या दिवशी तिने १६ वर्षे पूर्ण करून १७ व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबात हा वाढदिवस आनंदात साजरा झाला. आज रजा संपल्यानंतर ड्यूटीवर जायला निघालो अन् तृप्तीचा मृतदेहच दिसला. मुलांच्या भविष्यासाठी खूप केले. कोणत्याच गोष्टीची कमतरता घरात नव्हती. ती अशी अचानक निघून जाईल, असे वाटले नव्हते, हे सांगत असताना तिच्या वडिलांना अश्रू आवरता आले नाही.

Web Title: Girl suicide in jalgaon fear of low marks in CBSE 10th Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव