रागाच्याभरात निघालेली ती बालिका सापडली मुंबईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 09:13 PM2020-12-20T21:13:25+5:302020-12-20T21:13:35+5:30
मुलीला सुखरूप पाहून कुटूंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव : चार दिवसांपूर्वी रागाच्याभरात घरातून निघालेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. दरम्यान, बालिका जळगावात परल्यानंतर तिला सुखरूप पाहून तिच्या कुटूंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. अखेर एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे बालिकेच्या कुटूंबियांनी आभार मानले.
वडिलांचे निधन झाल्यामुळे अल्पवयीन बालिका ही मास्टर कॉलनीत राहत असलेले काका यांच्याकडे राहत होती. १६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ती दुध घेण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ होवून सुध्दा घरी न परतल्यामुळे तिची शोधाशोध कुटूंबियांनी केली होती. अखेर ती मिळून न आल्यामुळे काकाने पोलिसात धाव घेवून तक्रार दिली होती.
आणि... आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून आला फोन
गुन्हा दाखल होताच, एमआयडीसी पोलिसांनी बालिकेचा शोध सुरू केला़ एमआयडीसी पोलिसांना मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून फोन आला. आपल्या परिसरातील बालिका येथे असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे, महिला पोलीस कर्मचारी मालती वाडीले, होमगार्ड धिरज भगत यांनी लागलीच पोलीस निरिक्षक यांनी मुंबईला रवाना केले. पथकाने मुंबई पोलीसांकडून खात्री करून त्या अल्पवयीन बालिकेला ताब्यात घेवून सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले.
रागाच्याभरात निघून गेल्याचे सांगितले...
एमआयडीसी पोलिसांनी बालिकेला पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिची चौकशी केली. चौकशीअंती तिने रागाच्याभरात घर सोडल्याचे समोर आले़ तसेच रेल्वेने ती मुंबईला गेली असल्याचेही बाब समोर आली़ त्यानंतर बालिकेला कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील यांनी बालिकेला शोधण्यासाठी परिश्रम घेतले. तर यासाठी सामाजिक कार्यकर्ते इक्बाल पिरजादे आणि जिया बागवान यांचेही सहकार्य लाभले.