वर्षभरापूर्वी मुलीला पळविले, रेखाचित्र झाले आता तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 10:44 AM2020-07-22T10:44:44+5:302020-07-22T10:44:56+5:30
रेल्वे स्थानकावरील घटना : संशयित व बालिका सीसीटीव्हीत कैद
जळगाव : जयपूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याला डुलकी लागल्याचे पाहून एका संशयिताने खाऊ देण्याच्या बहाण्याने पाच वर्षाच्या बालिकेला पळविल्याचा प्रकार रेल्वे स्थानकावर एक वर्षानंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित व बालिका दोघंही सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेले असून संशयित हा गोवा एक्सप्रेसमध्ये बालिकेला घेऊन गेल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०१९ रोजी दुपारी १२.४५ वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर एक तरुण आपल्या पाच वर्षीय मुलीसह आला होता. त्यांना जयपूर येथे जायचे असल्याने फलाट क्रमांक तीनवर ते बसले होते. प्रकृती खराब असल्यामुळे या तरुणास झोप लागली. याच दरम्यान, संशयिताने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलविले. यानंतर तिला सोबत घेवून संशयित गोवा एक्सप्रेसमध्ये बसून रवाना झाला. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. वर्ष उलटूनही मुलीचा शोध लागू शकलेला नाही. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातील चिमुकलीला घेवून जाणारा संशयित दिसून येत आहे. त्याचे छायाचित्र तसेच रेखाचित्र जारी केले आहे.
चिमुकलीसह संशयिताचे वर्णन असे
अपहरण केलेली मुलगी पाच वर्षांची आहे. तीची उंची २ फूट ३ इंच आहे. रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण करणाºया संशयिताचेही फोटो, रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. संशयित ३५ ते ४० वयोगटातील आहे. त्यांची उंची ५ ते ६ फूट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. हा संशयित अथवा चिमुकलीबाबत काहीही माहिती मिळाल्यास संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी केले आहे.