मुलीचे पलायन, वडीलांनी घेतला गळफास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:36 AM2019-03-27T11:36:10+5:302019-03-27T11:37:02+5:30
साखरपुड्यानंतर तरुणी झाली बेपत्ता : आईला हृदयविकाराचा झटका; बहीण व भावाचा आक्रोश
जळगाव : साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरु असतानाच मुलीने पलायन केल्याने तणावात आलेल्या आईला ह्दयविकाराचा झटका आला. तिच्यावर उपचार सुरु असतानाच पित्यानेही राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असलेल्या शांताराम गायकवाड (काल्पनिक नाव) यांच्या मुलीचा गेल्या पंधरवाड्यात धुळे येथील मुलाशी साखरपुडा झाला. त्यात मुलीला दागिने व महागडे कपडे घेऊन दिले. लग्नाची तयारी सुरु करताच २१ मार्च रोजी सायंकाळी मुलीने घरातून पलायन केले. याबाबत पोलिसात हरविल्याची नोंदही झाली. दरम्यान, या घटनेमुळे आई व वडीलांना जबर धक्का बसला. मुलाकडील मंडळींना घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी वाद न वाढविता आमचे दागिने परत करा, असे सांगितले. त्यात दोन दिवसाची मुदत मुलीच्या वडीलांनी दिली. मुलगी पळून गेल्याने समाजात बदनामी झाली म्हणून आई तणावात गेली, त्यातच तिला हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी तिला औरंगाबादला हलविण्यात आले. तेथे मोठी मुलगी व मुलगा थांबून होते.
पतीच्या मृत्यूची बातमी समजताच गाठले थेट जिल्हा रुग्णालय
दुसरीकडे घरी कोणी नसताना पतीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती मिळताच दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीने दोन्ही मुलांसोबत थेट जिल्हा रुग्णालयात गाठले.गायकवाड यांचा मृतदेह पाहताच तिघांनी एकच हंबरडा फोडला. त्यात आधीच आईची प्रकृती चिंताजनक असल्याने दोन्ही मुलांनी तिला सावरले. दरम्यान, या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कुटुंब अद्यातपही तणावात
गायकवाड हे पत्नी संगीता, दोन मुली व मुलगा सनी यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास होते. हातमजुरीकरुन ते उदरनिर्वाह भागवित होते. या कामी त्यांना मुलगा सनी मदत करायचा. मोठी मुलगी ज्योती हिचे लग्न झाले असून लहान मुलगी मनिषा ही शिक्षण घेते. तिचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यानंतर तिने पलायन केले. या घटनेमुळे कुटुंब कमालीचे तणावात आहे.
अशी उघड झाली घटना
गायकवाड यांच्या घरापासून काही अंतरावर लहान भाऊ राहतात. गायकवाड घरी एकटे असल्याने मंगळवारी दुपारी बारा वाजता भावजयी जेवणासाठी त्यांना विचारणा करायला गेली असता, दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी आवाज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्यांना सांगितले.दरवाजा तोडला असता गायकवाड यांनी घरात पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.