९९ पैकी ६६ सुवर्ण पदकांवर मुलींनी कोरले आपले नाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:23+5:302021-04-28T04:17:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ ३ मे रोजी सकाळी ...

Girls engraved their names on 66 out of 99 gold medals ... | ९९ पैकी ६६ सुवर्ण पदकांवर मुलींनी कोरले आपले नाव...

९९ पैकी ६६ सुवर्ण पदकांवर मुलींनी कोरले आपले नाव...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाइन आयोजित करण्‍यात आला आहे. यंदा ९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झालेले असून, त्यात ६६ सुवर्णपदकांवर मुलींनी आपले नाव कोरीत बाजी मारली आहे. तर उर्वरित ३३ सुवर्णपदकांवर मुलांनी आपले नाव कोरले असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

दीक्षांत समारंभासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी राहणार असून, स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत, तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दोन्ही मान्यवरांचा दीक्षांत समारंभातील पदवीधरांशी होणारा संवाद हा निश्चित आगळा-वेगळा राहील, असे प्रा.ई. वायुनंदन यांनी सांगितले.

२६१ पीएच.डीधारक विद्यार्थी

दीक्षांत समारंभासाठी ४९ हजार ७५३ इतके स्नातक पदवी प्राप्त करण्यासाठी पात्र असून, त्यापैकी नोंदणी केलेल्या २८ हजार ९८ स्नातकांना या दीक्षांत समारंभामध्ये पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३५८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार १८९ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार ३५ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार ७९ स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये २६१ पीएच.डीधारक विद्यार्थी आहेत. याशिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक. च्या ४३७ विद्यार्थ्यांनादेखील पदवी बहाल केली जाणार आहे.

प्रमाणपत्रावर असणार क्यूआर कोड

पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव, क्यूआर कोड राहणार असून, या कोडच्या सहाय्याने मोबाइल अप्लिकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या होलोग्राममुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढली आहे, तसेच सदर समारंभ ऑनलाइन असल्याने स्नातकांना ऑनलाइन उपस्थिती देता येणार आहे. त्याकरिता स्नातकांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ३ मे सकाळी ९.३० वाजता लिंक उपलब्ध होईल, तसेच संस्थाचालक, प्राचार्य, प्रशाळा संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक हे या समारंभामध्ये याच लिंकद्वारे ऑनलाइन कार्यक्रम पाहू शकतात.

पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठविले जाणार

सध्याची कोविड प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन या दीक्षांत समारंभानंतर सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठविले जाणार आहे, तसेच सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनाही या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार नाही. त्याबाबतची माहिती या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरीत्या कळविली जाईल, तसेच अधिकची माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे. या पत्रकार परिषदेला प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. श्यामकांत भादलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील उपस्थित होते.

Web Title: Girls engraved their names on 66 out of 99 gold medals ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.