बसमधील गर्दीमुळे मुलीच्या हाताला दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:22+5:302021-02-13T04:17:22+5:30
जळगाव : तासाभरापासून पाचोरा-चाळीसगावकडे जाण्यासाठी बस नसल्यामुळे, जळगाव आगारात प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. यावेळी अचानक चाळीसगावकडून ...
जळगाव : तासाभरापासून पाचोरा-चाळीसगावकडे जाण्यासाठी बस नसल्यामुळे, जळगाव आगारात प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. यावेळी अचानक चाळीसगावकडून बस आल्यानंतर एकच गर्दी उडाल्याने, या गर्दीत एका दहा वर्षीय मुलीच्या हाताला फाटक लागून दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी जळगाव आगारात घडली. बस नसल्यामुळेच ही गर्दी वाढल्याने, प्रवाशांनी स्थानिक आगार प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
शुक्रवारी दुपारी जळगाव आगारात दुपारी दीडपासून अडीच पर्यंत पाचोरा-चाळीसगावसाठी एकाही बसची फेरी झाली नाही. यामुळे शिरसोली, वावडदा, सामनेर,नांद्रा व पाचोरा येथील विद्यार्थांसह प्रवाशांची स्थानकात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. त्यामुळे बस सोडण्याबाबत काही प्रवाशांनी चौकशी केंद्राकडे मागणी केल्यानंतरही बस सोडण्यात आली नाही. त्यानंतर अडीच वाजता चाळीसगावहून बस आल्यानंतर, ही बस पकडण्यासाठी विद्यार्थी व प्रवाशांनी एकच गर्दी केली. त्यामुळे बसमधील प्रवाशानांही उतरता येत नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. दरम्यान, या गोंधळात दहा वर्षीय मुलीच्या हाताला फाटक लागून, दुखापत झाल्याने तिच्या नातलगांनी चढणाऱ्या प्रवाशांवर व आगार प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकाराबाबत आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आगार प्रशासनातर्फे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, यावेळी कुठलीही जादा बस सोडण्यात आली नाही.