तरुणीच्या नावानं ‘इन्स्टा’वर स्टिकर, प्रकरण सायबरकडे; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By Ajay.patil | Published: September 7, 2023 07:55 PM2023-09-07T19:55:18+5:302023-09-07T19:57:00+5:30
याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी बनावट खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव - पाचोरा शहरातील एका भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून आक्षेपार्ह फोटो तयार करत तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी बनावट खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ वर्षीय तरुणी ही पाचोरा शहरातील एका भागात वास्तव्याला आहे, दरम्यान अज्ञात व्यक्तीने ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्रामचे २ बनावट खाते तयार करून पीडित तरुणीचा फोटो ठेवून त्यावर वेगळ्याच प्रकारचे स्टिकर लावले. त्यानंतर तिची बदनामी होईल या उद्देशाने सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने सुरुवातीला हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार पीडित तरूणीसह तिच्या नातेवाईकांनी बुधवारी दुपारी १ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते बनविणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.