गिरणा परिसरात रब्बी हंगामाचे यंदा तीन-तेरा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:01 AM2018-10-07T01:01:21+5:302018-10-07T01:05:05+5:30
चाळीसगाव तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगामाने मार खाल्ल्यानंतर रब्बी हंगामाचीही आता आशा धूसर होत चालली आहे.
सायगाव ता. चाळीसगाव :
चाळीसगाव तालुक्यातील सायगांव व मन्याड परिसरांतील आणि मन्याड धरणांवर विसंबून असलेल्या २२ गावांमध्ये या वर्षी रब्बी हंगामाचे तिन तेरा वाजणार हे आता निश्चित झाले असून मन्याड धरणात केवळ मृत जलसाठा शिल्लक असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
दरम्यान, दरवर्षी नवरात्रोत्सवात रब्बी पिकांची पेरणी केली जाते. परंतु यंदा पुरेसा पाऊस आणि प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशेचा सूर उमटत असून पहिल्यांदाच शेतकरी वर्ग रब्बी हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे शेतीच्या बाबतीत भाद्रपदाचे कडक ऊन आणि त्यात पाण्याची कमतरता भासत असल्याने दुष्काळात तेरावा माहिना असाच प्रकार म्हटला जात आहे.
आणि शेतकरी झाला हताश
यंदा हवामान खात्याने भरलेली हुल आणि इकडे शेतकºयांची उडालेली धांदल त्यात पुढे पावसाने लावलेली हजेरी. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी वाटत असतानांच हवामान खात्याने वर्तविलेले पावसाचे भाकीत पूर्णपणे निष्फळ ठरले. त्यातून आशेवर असलेला शेतकरी संकटात सापडला. पावसाळा संपला तरी परिस्थिती सुधारलीच नाही. परिणामी बळीराजा निराशेच्या गर्तेत सापडला असून कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती यंदा या परिसरात पाहायला मिळत आहे दुसरीकडे शेतकºयांनी लावलेली खरीपाची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेल्याने शेतकरी अत्यंत हताश झाला आहे.
कर्ज फेडण्याची चिंता
सायगांव व परिसरांतील शेतकºयांनी कुणी सावकारी कर्ज, कुणी बँकेचे कर्ज घेवून आपल्या शेतीचे गणित ठरविले होते. पण यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकरी हताश झाला असून त्यांच्यापुढे एकच प्रश्न आ वासून उभा आहे. तो म्हणजे डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे? या चिंतेचा घोर त्याला लागला असून सरकारी पातळीवर मात्र या पार्श्वभूमीवर काहीही हालचाल दिसत नसल्याने त्याच्या नैराश्यात भर पडली आहे. दुसरीकडे गुरा ढोरांना जगविण्याचा प्रश्नही त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यांना वेळेवर चारा पाणी मिळाले नाही तर..त्यामुळे पशुधन ठेवायचे की विकायचे हाही पेच बळीराजापुढे उभा आहे. कारण या वर्षी चाºयाची टंचाई देखील मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याची स्थिती जवळ जवळ येऊन ठेपली आहे.
गिरणा व मन्याड परिसरात पैसेवारी कमी लावण्याची मागणी
सायगांव व गिरणा, मन्याड परिसरात या वर्षी पाऊसच झाला नसल्याने जे येणारे उत्पन्न होते ते देखील मोठया प्रमाणावर घटले असून डोक्यावरील कर्जाचा भार वाढणार असल्याने येणारे दिवस काय घेऊन येतात, या चिंतेने शेतकरी पुर्णता खचला आहे.
यावर्षीचे तीन आणि पुढील वर्षाचे उन्हाळ्यासह सहा महिने कसे काढता येतील हा मोठा प्रश्न त्याला सतावत आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आणि लोकप्रतिनिधींनी यात जातीने लक्ष घालून पैसेवारी कमी लावण्यात यावी अशी मागणी परिसरांतून होत आहे .