गिरणा धरणाची सलग दुसऱ्या वर्षी शतकी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:50 PM2020-09-16T14:50:00+5:302020-09-16T14:52:13+5:30
1969 मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची तहान भागविणारे गिरणा धरण बुधवारी 100 टक्के भरले असून सलग दुसऱ्या वर्षी गिरणा धरणाने शतकी सलामी दिली आहे. 1969मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीनही मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढून वाघूर धरण यापूर्वीच 4 सप्टेंबर रोजी 100 टक्के भरले आहे. तसेच हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी साठा वाढून दररोज धरणाचे दरवाजे उघडले जात आहे. वाघूर धरण शंभर टक्के भरल्यानंतर आता गिरणा धरणही शंभर टक्के भरल्याने जिल्ह्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.
दरम्यान, गिरणा धरण पूर्ण भरल्याने धरणातून पाणी सोडण्याच्या विचार सुरू होता मात्र आता धरण क्षेत्रात पाऊस थांबल्याने तूर्त धरणाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा व इतर भागात पाऊस झाल्यास व धरणात वाढीव पाणी येऊ लागल्यास धरणाचे दरवाजे केव्हाही उघडावे लागतील अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली. सध्या दरवाजे उघडले नसले तरी नागरिकांनी नदीकाठावर जाऊ नये असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
योगायोग
गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2019 रोजी गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर यंदाही 16 सप्टेंबर रोजी हे धरण पूर्ण भरले आहे.
दृष्टिक्षेपात गिरणा धरण
- स्थळ - नांदगाव पासून वीस किलोमीटर वर
- उभारणी - 1969 (1955 मध्ये बांधकामाला सुरुवात व 1969 मध्ये पूर्ण)
-साठा - 21, 500 दशलक्ष घनफूट
- सध्याची स्थिती - 100 टक्के भरले
- जिल्ह्यातील लाभ क्षेत्र - 70 हजार हेक्टर
-लाभ - जिल्ह्यातील 175 गावे
- धरणाची शंभरी - 51 वर्षात 10 वेळा
गिरणा धरणाची आतापर्यंतची शंभरी
6 ऑक्टोबर 1973
26 सप्टेंबर 1976
29 सप्टेंबर 1980
11 ऑक्टोबर 1994
6 ऑक्टोबर 2004
2 ऑगस्ट 2005
23 सप्टेंबर 2006
15 सप्टेंबर 2007
17 सप्टेंबर 2019
16 सप्टेंबर 2020