भुसावळला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:55 PM2020-06-24T15:55:54+5:302020-06-24T15:57:02+5:30
सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींंनी केली आहे.
भुसावळ : येथील पालिकेतील सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींंनी केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव राऊत बुधवारी भुसावळात आले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.
दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाºया, रेल्वे जंक्शन, आॅर्डनन्स फॅक्टरी, मोठे व्यावसायिक शहरात राहतात. कोरोना महामारीच्या या काळात शहराची नाजूक स्थिती आहे. असे असताना पालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही, ही शोकांतिका आहे. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी किरण सावंत-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १५-२० दिवस कार्य केल्यानंतर त्यांच्या जागी चोपड्याचे मुख्याधिकारी अविनाश गांगाडे यांना आठवड्यातून दोन दिवस म्हणून मुख्याधिकारी पदाचा चार्ज देण्यात आला. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसणे ही भुसावळकरांची थट्टा आहे. शहरातील विकास कामे तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठे नुकसान होत आहे.
डहाळे ठरल्या राजकीय बळी
कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी पालिका, महसूल ,पोलीस, आरोग्य विभाग यांच्यात ताळमेळ बसवून समन्वय साधून महामारीच्यावर मात करणे शक्य होते. यात अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी असताना फक्त मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यांचा राजकीय बळी देण्यात आला. वास्तविक डहाळे मुख्याधिकारी असताना कंटेनमेंट झोनमध्ये बॅरिकेट्स लावणे, सॅनिटाईज करणे व इतरही समस्या त्वरित सोडवला जात होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची सोय करण्यात येत होती. सद्य:स्थितीला भुसावळ पालिकेला कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी डहाळे यांना पुन्हा सेवेत रुजू करावे, अशी मागणी भुसावळ येथे नूतन जिल्हाधिकारी राऊत आले असता नगरसेवक निर्मल कोठारी यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींसह सर्वांना फोनवर देत होते प्रतिसाद
पालिकेविषयी काही समस्या तसेच आरोग्याविषयी काही समस्या असल्यास मुख्याधिकारी डहाळे यांना कधीही फोन लावला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत होता. अनेक अधिकारी व्यस्ततेच्या नावाने प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचेसुद्धा फोन घेत नाही. अशांवर कारवाई न करता जे इमानेइतबारे काम करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा बळी देण्यात आला, असा सूर उमटत आहे.
विकास कामे रखडली
मुख्याधिकारी डहाळे पदावर असताना २५ कोटींच्या कामांना चालना मिळाली होती. सध्या विकास कामे रखडली असून, त्यांच्याकडे त्वरित पदभार द्यावा, अशी मागणी लावून धरली.