अतिक्रमणधारकांना व्यापारी संकुलात जागा द्या !
By admin | Published: July 12, 2017 01:15 AM2017-07-12T01:15:15+5:302017-07-12T01:15:15+5:30
जामनेर पालिका सभा : काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांची भूमिका
जामनेर : पालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाच्या बांधकामाच्या विषयावर काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. संकुलात शहरातील अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागा द्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केली. आघाडीचे गटनेते अनिल बोहरा यांनीदेखील मुख्याधिका:यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली.
18 विषयांवर चर्चा
पालिकेची विशेष सभा मंगळवारी सकाळी साडेदहाला झाली. यात 18 विषयांवर चर्चा करण्यात आली. पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाचे बांधकाम जि.प. कन्याशाळेच्या आवारात प्रस्तावित असून यासाठी आलेल्या निविदा मंजुरीचा विषय सभेपुढे मांडण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक जावेद इकबाल, रशीद यांनी बांधकाम ज्या ठेकेदाराला देण्याचा पालिकेचा प्रय} आहे त्यास विरोध केला.
राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी पालिका ठेकेदाराला पाठीशी घालत असून, तो बदलावा, अशी मागणी जावेद यांनी केली.
पूर्वीच्या टपरीधारकांना प्राधान्य
माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी व आघाडीचे गटनेते अनिल बोहरा यांनी मागणी केली की, प्रस्तावित व्यापारी संकुलात अतिक्रमणधारक व पूर्वीच्या टपरीधारकांना प्राधान्याने जागा देऊन सामावून घ्यावे.
पुरा भागात पालिकेच्या जागेत व्यायामशाळेचे बांधकाम करणे व साहित्य खरेदी करणे, विविध भागात विजेचे नवीन खांब टाकणे, आठवडे बाजार पाण्याच्या टाकीजवळ असलेली ओपन जिम ही घोडेपीर बाबाजवळील खुल्या जागेत स्थलांतरित करणे आदी विषयांवर सभेत चर्चा झाली.
या सभेला नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्षा सुनीता भोईटे, नगरसेविका सुनीता नेरकर, नंदा चव्हाण, शोभा धुमाळ, कल्पना पाटील, शहनाजबी न्याजमहम्मद, श्रीराम महाजन, पिंटू चिप्पट, अनिल बोहरा, पारस ललवाणी, छगन झाल्टे, इस्माईल खान, मुकुंदा सुरवाडे, अॅड.सीतेष साठे उपस्थित होते.
पालिकेने प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुल बांधकामाची निविदा दबाव तंत्राचा वापर करून काढली. आघाडीच्या एकाही नगरसेवकाला याबाबत विश्वासात घेण्यात आले नाही. संकुलातील गाळ्यांचे वाटप करताना अतिक्रमणधारक व टपरीधारकांना प्राधान्याने सामावून घ्यावे व पालिकेने याची यादी जाहीर करावी. -पारस ललवाणी, माजी नगराध्यक्ष, जामनेर