शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या : खासदार सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 09:52 PM2018-10-12T21:52:39+5:302018-10-12T21:57:35+5:30
कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले.
धरणगाव : कृषीप्रधान असलेल्या देशात शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले.
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, युवतीवरील अत्याचार व युवकांची व्यसनाधिनता विरोधात त्यांनी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले.
प्रास्तविक संस्थेचे सचिव डॉ.मिलींद डहाळे यांनी केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर , राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, पी.आर.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी, संचालीका निनाताई पाटील, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, मुख्याध्यापक प्रा.बी.एन. चौधरी, के.एम. पाटील, सी.के.पाटील उपस्थित होते.
तुझ्या प्रश्नाचे उत्तर मोदीसाहेबच देतील...
ईश्वर पवार या विद्यार्थ्याने आपली परिस्थिती गरीबीची असल्याने मी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू शकलो नाही. आरक्षण घटकात मोडत नसल्याने वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यावा लागला. शेतकºयाच्या लेकरांना सरकार फी माफी देत नाही तर दुसरीकडे मल्टीनॅशनल कंपन्यांना भरमसाठ सवलती सरकार देत आहे. तेव्हा हे सरकार १२५ कोटी जनतेचे आहे की मल्टीनॅशनल कंपन्यांचे..? असा प्रश्न उपस्थित करताच टाळ्यांचा गजर झाला. यावेळी खासदार सुळे मात्र निरुत्तरीत झाल्या. या प्रश्नाचे उत्तर मोदी साहेबच देवू शकतील. मी तुझा प्रश्न त्यांना टिष्ट्वटर वरुन विचारते व तुला कळवते असे त्यांनी सांगितले.