अनुकंपाधारकांना महिनाभरात न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:52+5:302020-12-31T04:16:52+5:30
जळगाव : मनपातील १०९ अनुकंपाधारकांच्या जागेपैकी ७० अनुकंपाधारकांची भरती करण्यात आलेली नाही. गेल्या ७ वर्षांपासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत मनपाच्या ...
जळगाव : मनपातील १०९ अनुकंपाधारकांच्या जागेपैकी ७० अनुकंपाधारकांची भरती करण्यात आलेली नाही. गेल्या ७ वर्षांपासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत मनपाच्या फेऱ्या मारत असून, आता अनुकंपाधारकांच्या संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले आहे. फेब्रुवारीपर्यंत अनुकंपाधारकांचा प्रश्न मार्गी लावा; अन्यथा आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन पुकारू, असा इशाराही लढ्ढा यांनी दिला.
गेल्या सात वर्षांपासून मनपाकडे वेळोवेळी निवेदन देऊनदेखील मनपा प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. ‘लोकमत’ने २९ रोजीच्या अंकात अनुकंपाधारकांचा प्रश्न मांडला होता. याच वृत्ताची दखल घेत मनपा स्थायी समितीच्या सभेत नितीन लढ्ढा यांनी अनुकंपाधारकांचा प्रश्न उपस्थित केला. मनपात ८०० हून अधिक जागा रिक्त आहेत. मनपाकडून कंत्राटावर कर्मचारी भरती केली जात आहे. मात्र, अनुकंपाधारकांना त्यांचा हक्क द्यायला मनपा तयार नाही. अनेक जणांची वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनुकंपाधारकांना न्याय देण्याची गरज असून, प्रशासनाने याबाबत गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज असल्याचे लढ्ढा यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवित लवकरच यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले.