‘दस लाख रूपये दे, नही तो बच्चे का मर्डर’ - जळगावात महिलेला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:09 PM2018-11-29T13:09:04+5:302018-11-29T13:09:35+5:30
जळगाव : खासगी बॅँकेत नोकरीला असलेल्या सुनंदा जालम चौधरी (वय ५२, रा.द्रौपदी नगर, जळगाव ) यांचे घर व दुचाकी ...
जळगाव : खासगी बॅँकेत नोकरीला असलेल्या सुनंदा जालम चौधरी (वय ५२, रा.द्रौपदी नगर, जळगाव) यांचे घर व दुचाकी जाळल्यानंतर आता पुन्हा त्यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर कॉल करुन १० लाखासाठी मुलाचा खून करण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी व बुधवारी घडला. तसेच एका अनोळखी व्यक्तीनेही बॅँकेत येवून चौकशीही केली. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल रेकॉर्डींग त्यांनी पोलिसांकडे सादर केले.
घर जाळण्याचाही केला होता प्रयत्न
या प्रकारामुळे चौधरी कुटुंब दहशतीखाली असून संबंधित व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी चौधरी यांनी यांनी केली आहे. याआधी १० नोव्हेंबरच्या रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चौधरी यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात दुचाकी, सोफासेट व खुर्ची जळून खाक झाली होती. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून दोघांनी हे कृत्य केल्याचा संशय चौधरी यांनी व्यक्त केला होता. तेव्हाही दुचाकीवरुन आलेले दोन्ही चोरटे घराच्या परिसरात येताना व दुचाकीवर पेट्रोल टाकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल होऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही.
सुपारी दिल्याचा संशय...
सोमवारी मोबाईलवर संपर्क केलेल्या व्यक्तीने स्वत:चे नाव दिलीप चौधरी असे सांगून ‘अनिल चौधरी इनके दस लाख रुपये दे, नही तो बच्चे का मर्डर करुंगा‘ अशी धमकी दिली.भावना यांचाही काही व्यवहार आहे. या दोघांचे पैसे तातडीने द्यावे, अशी धमकी या व्यक्तीने फोनवरुन दिली. ही व्यक्ती हिंदी भाषीक आहे. कल्याण येथून बोलत असल्याचे तो सांगत आहे. सुपारी देऊन हा प्रकार घडवून आणला जात असल्याचा संशय आहे. घाबरलेल्या चौधरी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांच्याकडेही रेकॉर्डींग व सीसीटीव्ही फुटेज दिले.
कॉल डिटेल्स मागविले
या प्रकरणात तपासाधिकारी मनोज वाघमारे यांना विचारले असता मोबाईलवरील धमकीच्या संदर्भात संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद येत आहे. त्यामुळे त्या क्रमांकाचे कॉल डिटेल्स मागविण्यात आले आहेत. त्यानंतरच ती व्यक्ती कोण व कुठून बोलत होती, हे स्पष्ट होईल, असे वाघमारे यांनी सांगितले. याआधी दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयितांना अद्याप अटक झालेली नसल्याचेही वाघमारे यांनी सांगितले. न्याय मिळावा म्हणून सुनंदा चौधरी या गुरुवारी सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांची भेट घेणार आहेत.