चाळीसगावात मराठा समाजाच्या मंगल कार्यालयासाठी दिली २२ हजार स्केअर फूट जागा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:14 PM2017-12-11T17:14:05+5:302017-12-11T17:23:27+5:30
संगमनेर येथील व्यावसायिकाचे दातृत्त्व
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.११ : समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून मुळचे संगमनेर येथील तर कर्मभूमी चाळीसगाव असलेले दिनकर कडलक (पाटील) यांनी २२ हजार स्केअर फुट म्हणजे तब्बल अर्धा एकर जागा मराठा समाज मंगल कार्यालयासाठी भेट दिली.
चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड येथील आदित्य मंडप डेकोरेटर येथे मराठा समाज बांधवांची १० रोजी बैठक झाली. मराठा मंगल कार्यालयासाठी दिनकर कडलक पाटील यांनी करगाव शिवारातील अर्धा एकर शेतजमीन एक रुपया न घेता मंगल कार्यालयाला देवू केली आहे. त्यांच्या दातृत्वा मुळे त्यांचा मराठा समाज बांधवांतर्फे शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला
प्रारंभी छत्रपती शिवराय व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समाधान बछाव यांनी चाळीसगाव येथे अनेक समाजाचे मंगल कार्यालय आहेत, मात्र मराठा समाजाचे मंगल कार्यालय नसल्याची खंत व्यक्त केली. दिनकर पाटील यांनी पुढाकार घेत जागा देण्याचे जाहीर केले. करगाव शिवारातील अर्धा एकर शेत जमीन म्हणजेच २२ हजार स्केअर फुट जागा मराठा मंगल कार्यालय करीता मोफत देण्यात आली आहे. मंगल कार्यालय उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन गणेश पवार यांनी केले. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की माझ्या आजीने शिर्डी साई संस्थानला जागा दिली होती. त्यांचा वारसा जोपासत व सामाजिक भान ठेवून समाजाचे मंगल कार्यालय व्हावे यासाठी जागा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दिनकर पाटील. गणेश पवार. खुशाल मराठे, रवि पाटील, राजेंद्र शिंदे, अरुण पाटील, योगेश पाटील, अजय पाटील, पी.एन.पाटील, जितेंद्र पवार, गणेश पाटील, अरुण शेवाळे, अरुण मांडे, छोटु अहिरे, भूषण पाटील, संजय कापसे, केशव पाटील, ईश्वर पवार, सचिन गायकवाड, संदीप जाधव, नाना पाटील, सचिन पवार, राजेश पाटील, समाधान बछाव, नीलेश साळुंखे, अशोक जगताप उपस्थित होते. आभार खुशाल पाटील यांनी मानले.