केसपेपर देण्यापासून ते अॅडमिटपर्यंतची माहिती देताना नाकीनऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:57+5:302021-01-15T04:13:57+5:30
जळगाव : विविध व्याधींसंबंधित उपचार घेण्यासाठी जिल्हाभरातून जिल्हा रुग्णालयात नागरिक येतात़ रुग्णालयात शिरताच... पहिला संबंध येतो, तो केसपेपर ...
जळगाव : विविध व्याधींसंबंधित उपचार घेण्यासाठी जिल्हाभरातून जिल्हा रुग्णालयात नागरिक येतात़ रुग्णालयात शिरताच... पहिला संबंध येतो, तो केसपेपर विभागाशी. जिल्हाभरातून नागरिक येत असल्यामुळे केसपेपरसाठी सकाळपासून रांगच लागते़ त्यांचे नाव, पत्ता, वय लिहून त्यांना काय तपासणी करावयाची आहे, याबाबत विचारून संबंधित ओपीडी कक्ष सांगितला जातो. दिवसभरात सुमारे ४०० नागरिकांना मार्गदर्शन करता-करता नाकीनऊ येते़ काही वेळेस अनेक जण वादही घालतात. त्यामुळे डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून त्या व्यक्तीशी बोलावे लागत असल्याचा अनुभव जिल्हा रुग्णालयातील केसपेपर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.
‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी जिल्हा रुग्णालयातील केसपेपर विभागातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दैनंदिन कामाची माहिती व त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. सकाळी ८ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री ८ या दोन बॅचमध्ये केसपेपर विभाग सुरू असतो. दररोज तीन-तीन कर्मचारी त्या ठिकाणी ड्यूटी बजावतात. जिल्हाभरातून नागरिक त्यांच्या व्याधींचा उपचार करण्यासाठी येतात़ त्याआधी केसपेपर काढतात़ त्यामुळे कधी-कधी प्रचंड गर्दी होते. काही वेळेस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशीही संपर्क होतो. मात्र, त्या रुग्णाच्या संपूर्ण शंकांचे निरसन करून संबंधित विभागात पाठविले जाते, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नियमित मास्कचा वापर
दररोज ४०० तर दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्राच्या दिवशी सुमारे ८०० व्यक्तींशी केसपेपर काढताना संपर्क येतो. त्यात त्यांना नाव, पत्ता, वय विचारले जाते़ कधी मोठी रांग असली तर त्यांना शिस्तीत उभे राहण्यासाठी सूचना केल्या जातात. त्यावेळी गळादेखील दुखतो़ केसपेपरपासून ते अॅडमिट करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे स्वत:लासुद्धा आरोग्याचा धोका असतो. त्यामुळे नियमित मास्क आणि हॅण्डग्लोजचा वापर केला जातो, असेही कर्मचाऱ्यांनी अनुभव सांगितले.
घरी आल्यावर पाल्यांपासून थांबतो दूर
स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने रोज ड्यूटी संपली की घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करतो. घरात मुले असून, त्यांच्याशी दूर राहतो़ ही खबरदारी राखत असल्यामुळे कुणाच्याही आरोग्यावर परिणाम झालेला नाही, असे केसपेपर काढणारे कर्मचारी विलास वंजारी यांनी सांगितले.
मानसिकता बघून बोलतो
केसपेपर उशिरा मिळाला की, काही लोक आरडाओरड करतात तर काही वाद घालतात़ त्यामुळे समोरील व्यक्तीची मानसिकता ओळखून त्याला सांभाळले जाते. नंतर त्याची समजूत घातली जाते. जोपर्यंत त्या व्यक्तीचे समाधान होत नाही. तोपर्यंत मार्गदर्शन केले जाते. दिवसभरात शेकडो नागरिकांना मार्गदर्शन करताना चांगलाच कस लागत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे. त्याचबरोबर रुग्णालयात वेळेवर येणे ही अपेक्षा आहे.
- विलास वंजारी, कर्मचारी, केसपेपर विभाग, जिल्हा रुग्णालय