सर्पदंश झालेल्या दोघांना मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 07:17 PM2018-07-28T19:17:44+5:302018-07-28T19:19:15+5:30
विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जळगाव : विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चोपडा तालुक्यातील गौºयापाडा येथील उन्मेष जगदीश बारेला (११) हा मुलगा मंगळवार, २४ रोजी सकाळी शौचास गेला असता त्याठिकाणी त्याला सापाने दंश केला. त्या वेळी या मुलाने घरी येऊन सर्पदंश झाल्याचे सांगितले. दंश करणारा साप विषारी असल्याने या मुलाची प्रकृती खालावत चालल्याने त्याला बेशुद्धावस्थेत चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याला जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बेशुद्धावस्थेत आलेल्या उन्मेषची दोन दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती.
दुसºया एका घटनेत पाचोरा येथील कमल रमेश डोंगरे (४५) या महिलेला सोमवार, २३ रोजी रात्रीच्या वेळी घरी झोपेतच सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालयात हलिवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांनाही जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनादेखील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या ठिकाणी दोघांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार व त्यांच्या सहकाºयांनी शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.