पंढरीची सायकल वारी करणाऱ्या चाळीसगावकर वारकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 PM2021-07-26T16:06:28+5:302021-07-26T16:07:00+5:30

वारी हे सामूहिक भक्तीचे प्रतीक- आमदार मंगेश चव्हाण यांचा भावस्पर्शी संवाद

Glory to Chalisgaonkar Warkaris who cycle Pandhari | पंढरीची सायकल वारी करणाऱ्या चाळीसगावकर वारकऱ्यांचा गौरव

पंढरीची सायकल वारी करणाऱ्या चाळीसगावकर वारकऱ्यांचा गौरव

Next



चाळीसगाव  : पंढरपुरची वारी हे सामुहिक भक्तिचे पृथ्वीतलावरील दूर्मिळ उदाहरण असून माझ्याही परिवारात गेल्या ६० वर्षात पायी वारीचा प्रघात कधी चुकला नाही. दोन वर्षापूर्वी याच भक्ति धाग्याला जोडत २३०० नागरिकांना स्वखर्चाने पंढरीची वारी घडवली. सायकलवर वारी करणा-या वारक-यांनी चाळीसगावच्या मातीतील भक्ति परंपरेची पताका थेट भूवैकुंठी फडवली आहे. याचा अभिमान वाटतो, असा भावस्पर्शी संवाद आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे साधला.
सोमवारी त्यांच्या हस्ते शिवनेरी या त्यांच्या निवासस्थानी चाळीसगाव ते पंढरपुर - अक्कलकोट - तुळजापुर या तीर्थस्थळांची एक हजार २० किमी परतीच्या प्रवासासह सायकलवारी करणा-या हौशी सायकलविरांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी सायकलविरांचे औक्षण केले. विठूराया व रुख्मिणी मातेची मुर्ती भेट देऊन सायकल वारक-यांचा सन्मान केला गेला.
पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले की, वारीत गरीब - श्रीमंत हा भेद गळून पडतो. मुखातून विठूरायाचा गजर होत असतांना अंगात पांडुरंगाला पाहण्यासाठी प्रत्येक पावलागणिक नवे बळ संचारत असते. पायी वारीचा अनुभव माझ्याही गाठीशी आहे. यंदा कोरोनामुळे पायी वारी बंद असल्याने सायकलविरांचे म्हणूनच कौतुक वाटते. यंदाही आषाढी एकादशीच्या पर्वणीवर आॕनलाईन अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. यालाही जोरदार प्रतिसाद मिळाला. सायकलवारीची ही परंपरा पुढेही सुरुच रहावी. यासाठी आपले नेहमी सहकार्य राहील. असेही त्यांनी अश्वासित केले. शिवनेरी फाऊंडेशनने नेहमीच विज्ञान - अध्यात्म यांची योग्य सांगड घालून उपक्रम राबविले आहे. सायकलवर पंढरपुरची वारी करणे, हे साहसाचे काम आहे. म्हणूनच सायकलवीर वेगळे ठरतात. असे प्रतिपादन प्रतिभा चव्हाण यांनी केले.
यावेळी भास्कर पाटील, योगेश खंडेलवाल, जगदिश चव्हाण, मनोज गोसावी आदि उपस्थित होते.
.....

यांचा झाला गौरव
चाळीसगाव ते पंढरपुर - अक्कलकोट - तुळजापुर ही एक हजार २० किमीची सायकलवारी करणारे टोनी पंजाबी, कवी व पत्रकार जिजाबराव वाघ, रवींद्र पाटील, अरुण महाजन, सोपान चौधरी, लिलाधर पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पांडुरंगाचा जयघोष करीत गजरही केला.

Web Title: Glory to Chalisgaonkar Warkaris who cycle Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.