कचऱ्यात माती भरण्याचा प्रताप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:42+5:302020-12-24T04:15:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्यात माती टाकून वजन वाढविण्याचे काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्यात माती टाकून वजन वाढविण्याचे काम सुरूच
आहे. बुधवारी शहरातील का. ऊ. कोल्हे शाळेच्या मागे मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक्टरमध्ये चक्क कचऱ्याऐवजी माती भरण्याचेच काम
सुरू होते. मनपा महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांचे पती व भाजपचे कार्यकर्ते भरत कोळी यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, याबाबत मनपा प्रशासनाकडे देखील तक्रार केली आहे.
वॉटरग्रेसने सफाईचे काम सुरू केल्यानंतर हा मक्ता चांगलाच गाजत आहे. सुरुवातीपासून मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याचे वजन
वाढविण्यासाठी नवनवीन फंड्याचा वापर केला आहे. सुरुवातीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठमोठे दगड टाकले जात होते. त्यानंतर वृक्षाच्या
फांद्या टाकण्यात आल्या. आता मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याऐवजी माती टाकण्याचे काम सुरू केले आहे. वजन वाढवून मनपाकडून बिलांची रक्कम वाढवून घेण्याचे काम मक्तेदाराकडून सुरू आहे. मनपाकडे याबाबतच्या तक्रारी याआधीही प्राप्त झाल्या होत्या. मात्र, मनपाने मक्तेदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे मनपाने एकही नोटीस नव्याने वॉटरग्रेसला अशा तक्रारींबाबत बजावलेली नाही.
तक्रारीची चौकशी करा - महापौरांच्या सूचना
वॉटरग्रेसकडून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत आलेल्या तक्रारीनंतर महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावर चौकशी करून कडक कारवाईच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. तसेच वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबतही मनपा प्रशासनाने तत्काळ गांभीर्याने लक्ष घालून संबंधित कंपनीने केलेला करारनामा मिळवून, हा मक्ता त्वरित रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात येणार बैठक?
वॉटरग्रेसबाबत राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईला बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मनपा आयुक्तांना देखील बोलावण्यात येणार असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली आहे.