भुसावळात तिरंगा वाढवणार रेल्वेस्थानकाची शान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:09 PM2019-01-01T18:09:52+5:302019-01-01T18:11:28+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २६ जानेवारीला १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे. भुसावळ विभागात फक्त भुसावळ स्थानकासमोर १०० फूट उंचीवर एकमेव हा तिरंगा असणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकाची शान वाढणार आहे.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागात भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २६ जानेवारीला १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे. भुसावळ विभागात फक्त भुसावळ स्थानकासमोर १०० फूट उंचीवर एकमेव हा तिरंगा असणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकाची शान वाढणार आहे.
डीआरएम आर.के.यादव यांनी अतिक्रमण मोहीम यशस्वी केल्यानंतर झपाट्याने विकास कामे सुरू केली आहे. नुकतेच स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली जीआरपी ही इमारत जमीनदोस्त करून त्याठिकाणी रणगाडा ठेवण्यात आला आहे. याच ठिकाणी उद्यानाची निर्मिती होत आहे. तसेच देशभक्तीची भावना कायम मनात राहावी व सदैव विकास कामासाठी देशासाठी प्रेरणा मिळावी यासाठी व रेल्वे स्थानकाची शान वाढविण्यासाठी १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे.
भुसावळ विभागात एवढ्या उंचावर एकमेव हा तिरंगा असेल झेंड्याची लांबी रुंदी अजून, निश्चित झालेले नाही. यावर विशेष डिझायनरसोबत चर्चा करून लांबी व रुंदी निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी तीन बाय तीन मीटर व व दोन मीटर खोल अशा पद्धतीचे फाउंडेशन तयार करण्यात येणार आहे.
झेंडा उद्यान व स्थानकाची शान वाढवणार हायमास्ट लॅम्प
रेल्वेस्थानकाच्या दक्षिण प्रवेश द्वारासमोरील निर्मित होणाऱ्या उद्यानाची नवीन झालेल्या पार्किंग तसेच १०० फूट उंचीवरील तिरंग्याची शान वाढवण्यासाठी व या परिसरात मध्ये प्रकाश उजळून दिसण्यासाठी तिन्ही कोपºयावर हायमास्ट लॅम्प बसविण्यात येणार आहे. यापैकी एक हायमास्ट ल्ॉम्पची उंची ६० फूट, तर दोन हायमास्ट लॅम्पची उंची जवळपास ५० फूट असेल. एका हाय मास्टलॅम्पमध्ये नऊ एलईडी प्रत्येकी १५० वॅटचे दिवे बसविण्यात येणार आहे. एक हाय मास्ट लॅम्प जवळपास ४० ते ५० मीटरचा प्रकाशमय एरिया कव्हर करेल, इतकी एकाची क्षमता आहेत. एक हाय मास्टलॅम्प पार्किंगमध्ये, दुसरा दर्गा जवळ तर तिसरा हाय मास्ट गार्ड लाईनच्या रस्त्याला लागून लावण्यात येणार आहे. तिन्ही बाजूने हाय मास्ट लॅम्प लावल्यानंतर संपूर्ण परिसर प्रकाशमय होणार आहे.
वाहन एक्झिटजवळही वृक्षारोपण
दुचाकी व चारचाकी पार्किंगमधून स्थानकाच्या बाहेर जाण्यासाठी मार्गाला लागून जागेवर ही विविध झाडे लावून यामुळेही स्थानकाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
दरम्यान, १०० फूट उंचीवर तिरंगा झेंडा लावण्यासाठी डीआरएम आर.के.यादव, वरिष्ठ अधिकारी एम.एस.तोमर, राजेश चिखले, राजेंद्र देशपांडे, स्टेशन निर्देशक जी.आर. अय्यर, इलेक्ट्रिकल विभागाचे वहीद खान यांनी उद्यानातील जागेचे सर्वेक्षण केले.