चमकोगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:16 PM2018-09-22T15:16:39+5:302018-09-22T15:17:16+5:30
‘लोकमत’च्या ‘मंथन’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत विलास भाऊलाल पाटील....
पूर्वी ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ ही नेतृत्वाची शोभा मानली जायची. आजकालच्या संस्कृतीत अशा पद्धतीने वागणारी व्यक्ती बावळट समजली जाते. याउलट उच्च राहणी आणि निम्न विचारसरणी अशी व्यक्ती आदरास पात्र ठरते.
‘भीक नको पण कुत्रे आवर’ या धरतीवर काम नको पण चमको आवर’ अशी परिस्थिती आजकाल सभा, समारंभ, कार्यक्रम, उपक्रम व विशेषत: राजकीय क्षेत्रात निर्माण झाली आहे. कामापेक्षा फोटो, प्रसिद्धी, व्यासपीठ अशी नवी संस्कृती सर्वच क्षेत्रात निर्माण झाली आहे. पूर्वी सर्वच क्षेत्रात प्रत्येकाला उमेदवारी करावी लागत असे. सार्वजनिक जीवनात छोटे-मोठे कार्यक्रम उपक्रम राबवावे लागत. त्यातून कार्यकर्ता आणि मग नेता निर्माण होत असे. या काळात त्याला सतरंज्या, पट्ट्या उचलण्यापासून झाडू मारण्यापर्यंत प्रसंगी पडेल ते काम करावे लागत असे. त्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार येत असे, पैलू पडत असत आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून एक संस्कारी कार्यकर्ता नेता घडत असे. संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष यामध्ये प्रशिक्षण देण्याची निरंतर प्रक्रिया सुरू असे. अनेक मोठमोठे नेते कार्यकर्ते यापूर्वी याच प्रक्रियेतून घडलेले आहेत. आजकाल या सगळ्याच गोष्टींना फाटा मिळालेला आहे. रेडिमेड कार्यकर्ते आणि रेडिमेड नेते तयार होऊ लागले आहेत. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, वकिलाचा मुलगा वकील आणि सिने कलावंताचा मुलगा सिनेकलावंत याच पद्धतीने नेत्याचे वारसदार (गरजेप्रमाणे मुलगा, मुलगी, सून किंवा पत्नी) नेते होऊ लागले आहेत. या डिजिटल क्रांतीमुळे नेते निर्माण होण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी, सुटसुटीत व स्वस्त झाली आहे. ‘सोशल मीडियाचा’ मोठाच हातभार या कामाला लागला आहे. एखाद्याचा वाढदिवस, घटदिवस किंवा काहीही फालतू काम त्याचे मोठमोठे डिजीटल बॅनर्स बनवायचे रातोरात गावागावात, चौकाचौकात लावायचे, छोटामोठा कार्यक्रम करावयाचा (म्हणजे नुसता दिखावाच, इव्हेंट) त्याचे फोटो, व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करायचे, प्रसंगी पाकीट संस्कृतीच्या माध्यमातून प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचाही वापर करायचा की झाला तो किंवा ती रातोरात नेता. एखाद्या कार्यक्रमानंतर वृत्तपत्रातून आपले नाव व फोटो छापून यावा यासाठी प्रचंड धडपड सुरू असलेली दिसते. रेटारेटी करणे, एकमेकांच्या अंगावर पडणे असे प्रकारही करायला काही महाभाग कमी करत नाही. तो कार्यक्रम किंवा ती वेळ काय आहे? याचेही भान या ‘चमकोंना’ राहत नाही. अंत्ययात्रा, गंभीरप्रसंगी मदत करावयाचे सोडून त्या ठिकाणी फोटो, व्हीडीओ किंवा खास करून ‘सेल्फी’ काढणाऱ्या महाभागांची संख्याही कमी नाही. हा रोग फक्त राजकीय क्षेत्रातच नसून सर्वच क्षेत्रात फोफावलेला दिसत आहे. हे विशेष. याचे कारण असे की पूर्वी ‘काम असे करा की नाव झाले पाहिजे’ ही वृत्ती होती. म्हणजे तुम्ही काम केले (ते छोेटे किंवा मोठे असो) त्याची दखल घेतली जायची व आपोआपच त्या माध्यमातून तुमचे नाव व्हायचे. पण आता ‘नाव असे करा की काम झाले पाहिजे’ ही वृत्ती नव्याने उदयास आली आहे. याचा अर्थ असा तुम्ही चमकोगिरी करा, नेत्यांच्या मागेपुढे फिरून त्यांच्याशी माझी किती जवळीक आहे हे दाखवा. त्या माध्यमातून एखादे पद पदरात पाडा, व्हीजीटींग कार्ड, लेटरहेड छापा, सवंग प्रसिद्धी मिळवा आणि अधिकाºयांवर, लोकांवर प्रभाव पाडून उलटसुलट धंदे करा किंवा अशा धंद्याना संरक्षण मिळवा हा नवा फंडा आता उदयाला आला आहे. आता कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याची गरज नाही. नेत्यांच्या मागेपुढे फिरा, त्यांना विमानतळ, रेल्वे स्टेशनवर घ्यायला, सोडायला जा, घरी जेवायला बोलवा, सर्कीट हाऊसवर आसपास रहा म्हणजे थोडक्यात ‘कार्यकर्ता’ बनण्याऐवजी एअरपोर्ट, भोजनावळे, सर्कीट हाऊस असे हौसेनौशे बना उलटसुलट धंदे करून माल कमवा. तो माल इलेक्शनमध्ये लावा.‘माल लगाओ’ माल कमाओ’ हा नवा बिनारिस्कचा, प्रतिष्ठेचा धंदा म्हणून करा. हा आजच्या समाज जीवनाचा फंडा झाला आहे. पण जनतेलाच जर हे सारे मान्य असेल तुमच्या माझ्यासारखे काय करू शकतात?
-विलास भाऊलाल पाटील, जळगाव