जीएमसीत आग लागली पळा पळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:19+5:302021-01-15T04:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर अखेर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर अखेर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आग लागल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय काय ? आणि कसे करावे याचे प्रात्याक्षिक दाखवून अग्निशमन विभागाने हे आग विझविण्याचे धडे दिले दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत हे प्रशिक्षण सुरू होते. यात सर्व डॉक्टर्स व कर्मचारी सहभागी झाले होते.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे मॉक ड्रील घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जीएमसीकडून महापालिकेला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारी दुपारी हे प्रात्याक्षीक दाखविण्यात आले. यात कचऱ्याला आग लावून ती सिलिंडरने विझवायची कशी याचेही प्रात्याक्षिक झाले. मात्र, हा कचरा बराच वेळ तसाच पडून होता. महानगरपालिकाच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नुकतीच ४ वाहने दाखल झाली असून त्यातील एका वाहनाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.
यावेळी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन भरत बारी, सहाय्यक फायरमन तेजस जोशी, प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, नितीन बारी आदी उपस्थित होते.
आग चार प्रकारांची
आग ही ए, बी, सी, आणि डी या चार प्रकारात मोडते. कापड, लाकूड साहित्य यांना लागणारी आग ही ए, लिक्वडीमुळे लागणारी आग बी, गॅसमुळे लागणारी आग सी आणि शॉर्ट सर्कीटमुळे लागणारी आग ही डी प्रकारात मोडते. या आगी विझविण्यासाठी यंत्रणाही वेगवेगळी वापराव्या लागतात. इलेक्ट्रीक पॅनलला आग लागल्यानंतर त्यावर पाणी न मारता ती सिलिंडरच्या सहाय्यानेच विझवावी लागेल. सर्वात जास्त आगी या शॉर्ट सर्कीटमुळेच लागतात, त्यामुळे इलेक्ट्रीक फिटींग व्यवस्थित असावे, असे अग्र्निशम अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे कुणालाच माहिती नव्हते
आग विझविणारे सिलिंडर कुणी वापरून बघितले आहे का? असा प्रश्न जेव्हा फायरमन अश्वजीत घरडे यांनी विचारला त्यावेळी कोणाकडूनही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर मग आग विझविणाऱ्या सिलिंडरबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. सहाय्यक फायरमन प्रकाश चव्हाण यांनी गॅस सिलिंडरला आग लागल्यास ती नियंत्रणात कशी आणायची याचे प्रात्याक्षिक दाखविले काही परिचारिकांनी स्वत: यात सहभाग नोंदवून आग विझविली.
येथे करा संपर्क
आग लागल्यास या २२२४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा. लँन्डलाईनने संपर्क केल्यास थेट नंबर लावावा, मोबाईलवरून लावताना आधी कोड लावाला असे अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.