जीएमसी अखेर पूर्ण कोविड घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:02+5:302021-03-21T04:16:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व बेड मॅनेजमेंटचा उडणारा गोंधळ थांबविण्यासाठी अखेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व बेड मॅनेजमेंटचा उडणारा गोंधळ थांबविण्यासाठी अखेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे शनिवार २० मार्चपासून पुढील आदेश होईपर्यंत पूर्णत: कोविड घोषित केले आहे. या ठिकाणच्या नॉन कोविड रुग्णांना राजर्षी शाहू महाराज रुग्णालय व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात यावे, असे आदेशही त्यांनी दिले आहे. दरम्यान, त्या दृष्टीने जीएमसीत आधीपासून नियोजन सुरू करण्यात आले होते. सी १ कक्षात आपात्कालीन कक्ष व त्या ठिकाणचे कर्मचारी हलविण्यात आले आहे. या ठिकाणी नॉन कोविड अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. तर मुख्य इमारतीसह सर्व कक्षांमध्ये काेविडवर उपचार केले जाणार आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत हे नवीन कक्षही फुल झालेले होते.
पहिल्या दिवशी तीन कक्ष उघडले
सी टू कक्षात ६४
सी थ्री कक्षात २४
कक्ष क्रमांक ७ ते ९ मध्ये : ६० रुग्ण दाखल आहेत.
अतिदक्षता विभागात २६ रुग्ण दाखल आहेत.
अन्य कक्षांचे नियोजन सुरू
१२ व १३ क्रमांकाच्या कक्षाकडे जाणारा मार्ग अद्याप बंदावस्थेत आहे. शिवाय प्रसुती पूर्व व प्रसुती पश्चात, बालकांचा कक्ष हे कक्ष बंदवस्थेत असून प्रसुती पश्चात कक्षात सहा महिला अद्याप दाखल होत्या. त्यांना रविवारी राजर्षी शाहू महाराज रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तर शनिवारी दोन महिलांना पाठविण्यात आले होते. त्यातील एक महिला परत आल्याची माहिती आहे. अन्य महिलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, तीन बालकांनाही डिस्चार्ज दे्यात आला असून हे कक्षही बंद करण्यात आले आहे. अद्याप ते कोविडसाठी वापरात नाहीत.
४५० बेड मात्र मनुष्यबळ हवे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑक्सिजन पाईपलाइृन अंतर्गत आता ४५० बेडची व्यवस्था आहे. मात्र, हे सर्व कक्ष सुरू करण्यासाठी मनुष्यबळाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे प्रतिनियुक्तीवरील डॉक्टर जसे जसे रुजू होतील, तसे तसे टप्प्या टप्प्याने कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.