जीएमसी, जि.प. व विद्यापीठ ठरतेय हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:40+5:302021-03-19T04:15:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना अगदी झपाटयाने वाढत असून मार्च महिन्यात ही शासकीय कार्यालयेच हॉटस्पॉट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना अगदी झपाटयाने वाढत असून मार्च महिन्यात ही शासकीय कार्यालयेच हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयातील प्रशासकीय भागही कोरोनाने व्यापला असून दुसरीकडे कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांवावर कोरोनाचा असा परिणाम होत आहे.
जिल्हा परिषदेत मार्च अखेरची धावपळ सुरू असताना अचानक कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढायला सुरूवात झाली आहे. यात रोज कर्मचारी बाधित आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचाही कोरोना अहवाल बाधित आला होता. त्यानंतर आरोग्य विभागात तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात एक कर्मचारी बाधित आढळून आला होता. प्रत्येक विभागात बाधित कर्मचारी आढळून येत असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असून कामांवर असाही त्याचा परिणाम होत आहे.
जीएमसीत विस्फोट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील जवळपास ३० डॉक्टर व अन्य कर्मचारी २० पेक्षा अधिक बाधित झाले आहेत. यात बुधवारी सायंकाळी पुन्हा काही कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे संकट उभे राहिले आहे.
विद्यापीठात शिरकाव
कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील १२ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणीही उपस्थितीला निर्बंध आले आहेत. यासह महापालिकेतील एक अधिकारीही दोन दिवसांपूर्वी बाधित आढळून आले आहेत.