जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:49+5:302021-07-25T04:15:49+5:30
सावदा, ता. रावेर : भावविभोर अंतःकरणाने वारकऱ्यांनी भगवान श्रीविठ्ठलाचा निरोप घेत पुढची वारी पायीच होऊ दे, कोरोनाचे संकट ...
सावदा, ता. रावेर : भावविभोर अंतःकरणाने वारकऱ्यांनी भगवान श्रीविठ्ठलाचा निरोप घेत पुढची वारी पायीच होऊ दे, कोरोनाचे संकट घालव अशी आर्त विनवणी केली. परतवारीकरिता मुक्ताईनगरकडे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान केले. रविवारी सकाळी ९ वाजता नवीन मुक्ताबाई मंदिर येथे पालखी सोहळा आगमन होईल.
पंढरपूर येथून निघण्यापूर्वी पहाटे काकड आरती लवकर आटोपून गोपाळपूर येथे काल्यासाठी मुक्ताबाई दिंडी सोहळा दाखल झाला. तेथे गोपाळपूर सरपंच विलास मस्के, गोपालकृष्ण मंदिर अध्यक्ष दिलीप गुरव ,पंढरपूर तहसीलदार सुशीलकुमार बल्व्हे यांनी स्वागत केले. ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन झाले.
तदनंतर परिक्रमा करून पालखी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आली असता समितीचे अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर, विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ॲड. माधवी निगडे, प्रशासकीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी श्री संत मुक्ताबाई पादुकांचे पूजन केले. मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, विणेकरी रतिराम महाराज शास्त्री, रवींद्र महाराज हरणे, पंजाबराव पाटील, शंकरराव पाटील, निळकंठराव पाटील यांचा सन्मान केला. त्यानंतर मुक्ताबाई व विठ्ठल-रुक्मिणी भेट सोहळा झाला. वारीसोबत आलेल्या सर्व वारकरी, कर्मचारी यांनी शांततेत विठ्ठल दर्शन घेतले. दुपारी मुक्ताई मठात परतवारीचे अभंगांचे भजनात सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पालखी पूजन आरती केली. सोपानकाका पालखी सोहळ्याचे ह.भ.फ.त्रिगुणमहाराज गोसावी यांचे हस्ते पादुका बसमध्ये आसनस्थ करून परतवारी प्रवास सुरू झाला. चंद्रभागा तीरावर आरती पसायदान करून वारीचा समारोप झाला. जालना येथे संध्याकाळी मुक्काम करून रविवारी सकाळी ९ वाजता पालखी सोहळा मुक्ताईनगर येथे नवीन मंदिरात पोहोचेल.
ठळक क्षण
पंढरीनाथाचे निरोपाचे अभंग व भजन गात असतांना वारकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.
पाळपूर येथे संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला काल्याच्या कीर्तन करण्यात येणाऱ्या ठिकाणी मुक्ताबाई पालखी तळ ओटा बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
बरेच दिवसांपासून आईसाहेब सोहळ्यासोबत पायी वारी करण्याची इच्छा होती. सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या दिंडी परंपरेची जबाबदारी असल्याने वेळेचे नियोजन जमत नव्हते. अखेर कोरोनामुळे आईसाहेब मुक्ताबाईसोबत बसने का होईना वारीचा योग आला. अनंत जन्माची पुण्याई फळाला आली.
- नरेंद्र नारखेडे, अध्यक्ष, सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर दिंडी परंपरा