देह जावो अथवा राहो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:52 PM2019-07-25T22:52:57+5:302019-07-25T22:53:38+5:30

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पैठण येथे जीवनाविषयी एक तत्त्व सांगितले. ते तत्त्व होते प्रयत्नशीलता, निष्ठा, कोणत्याही परिस्थितीत ...

Go to the body or stay ... | देह जावो अथवा राहो...

देह जावो अथवा राहो...

Next

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पैठण येथे जीवनाविषयी एक तत्त्व सांगितले. ते तत्त्व होते प्रयत्नशीलता, निष्ठा, कोणत्याही परिस्थितीत आपले विधी, आचरण, साधना न सोडण्याचे. अखंड साधना, भक्ती, आचरण कशी करावी, ती प्रत्यक्ष आचरणात आणल्यानंतरच तिच्यातल्या अडीअडचणी खाचखळगे लक्षात येतात. मग आपण त्या अडीअडचणींवर कौशल्याने आपल्या ध्येयप्राप्तीच्या निष्ठेने मात करायला शिकले पाहिजे.
चक्रधर स्वामींनी वानरीचा दृष्टांत सांगितला
वानरी असे, ऐल खांदीवरून पैल खांदी जाए
पैल खांदीवरून ऐल खांदी,
देखतेया परी हे पडेल
परी धरी ती परी, ते तेचि जाणे न सुटते सूत्र ते तेचि जाणे....
वानरी आपल्या पिलाला घेऊन एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाते. त्यावेळी ती खाली पडेल असे आपल्याला वाटते पण ती पडत नाही कारण या फांदीवरून त्या फांदीवर चालतांना खाली न पडण्याचे कौशल्य तिने आधीच आत्मसात केलेले असते. त्याचप्रमाणे साधक हा भौतिक सुख, ऐश्वर्याच्या अधीन झाला की त्याला नरकवास भोगावा लागतो. यासाठी आपली परमेश्वरावरील भावभक्ती, निष्ठा, साधना सुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ती साधना, निष्ठा त्याने प्रयत्नाने संपादन करायला हवी. चक्रधर स्वामींनी हे सूत्र परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयासाठी सांगितले असले तरी संसार प्रापंचिक जीवनासाठीही ती आहे.
आपल्या इच्छित ध्येय प्राप्तीसाठी या सूत्रातून निष्ठा, प्रयत्नवाद व कौशल्याची शिकवण मिळते. उद्दिष्ट प्राप्तीचा अडथळा पार करण्यासाठी हा दृष्टान्त सूत्र निश्चितच आपणास प्रेरणा दायी आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधा मुंगळादेखील किती अढळ असतो, हे स्वामींनी त्यांच्या माकोड्याच्या दृष्टांतातून सांगितले आहे. एखाद्या वस्तूला तो लागला म्हणजे तो सोडत नाही त्याचे अर्धे धड तुटले तरी चालेल पण तो त्या वस्तूला चिटकून राहतो. त्याचप्रमाणे साधकाने आचरणाची प्रक्रिया आपल्या निष्ठेने, प्रयत्नाने साध्य करायला हवी व त्याचे पालनही करायला हवे. याविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात ‘ देह जावो अथवा राहो’ असा साधक असो की प्रपंचातील व्यक्ती त्याला त्याच्या उद्दिष्ट प्राप्तीत निश्चितच यश मिळेल.
- वासुदेव चव्हाण, शहापूर, ता.जामनेर

Web Title: Go to the body or stay ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव